भीषण दुर्घटना... ट्रॅक्टर ट्राॅली कॅनाॅलमध्ये कोसळून ४ महिलांचा बुडून मृत्यू
By दत्ता यादव | Updated: June 24, 2023 21:15 IST2023-06-24T21:13:59+5:302023-06-24T21:15:42+5:30
सातारा शहराजवळील घटना; शेतातून परतत असताना दुर्घटना

भीषण दुर्घटना... ट्रॅक्टर ट्राॅली कॅनाॅलमध्ये कोसळून ४ महिलांचा बुडून मृत्यू
सातारा : शेतातील काम आटोपल्यानंतर ट्रॅक्टर ट्राॅलीमधून घरी परतत असताना कॅनाॅलमध्ये ट्राॅली कोसळून चार महिलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला तर दोन महिलांना वाचविण्यात यश आलं. ही धक्कादायक घटना सातारा शहराजवळील कारंडवाडी येथे शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. लीलाबाई शिवाजी साळुंखे (वय ६०), उल्का भरत माने (वय ५५), अरुणा शंकर साळुंखे (वय ५८), सीताबाई निवृत्ती साळुंखे (वय ६५, सर्व रा. कारंडवाडी, ता. सातारा) अशी बुडून मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा शहराजवळून जाणाऱ्या महामार्गालगत कारंडवाडी हे गाव आहे. या गावातील सात ते आठ महिला शनिवारी सकाळी शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी चारच्या सुमारास अचानक पाऊस आल्याने सर्व महिला ट्रॅक्टरमध्ये बसून घरी यायला निघाल्या. कारंडवाडी-देगाव रस्त्यावरील कॅनाॅलशेजारून ट्रॅक्टर येत असताना वळणावर अचानक ट्रॅक्टरची ट्राॅली कॅनाॅलमध्ये कोसळली. त्यामुळे वरील चार महिलांचा कॅनाॅलमधील पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोन महिलांना ट्रॅक्टर चालक व इतरांनी कसेबसे कॅनाॅलमधून बाहेर काढले. यामुळे त्यांचा जीव वाचला. परंतु त्यांचीही प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एकाच गावातील चार महिला कॅनाॅलमध्ये बुडाल्याचे समजताच कारंडवाडी गावातील नागरिक, महिला तसेच सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके हे आपल्या कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिस व नागरिकांनी चारीही महिलांचे मृतदेह कॅनाॅलमधून बाहेर काढून जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले.
गावावर शोककळा...
कारंडवाडी गावातील चार महिलांचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली. मोलमजुरी करणाऱ्या या चार कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेची गावात वाऱ्यासारखी माहिती पसरली. त्यानंतर गावकरी, नातेवाइकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. यावेळी नातेवाइकांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. जो-तो या घटनेबाबत हळहळ व्यक्त करत होता.
असा झाला अपघात..
शनिवारी दुपारी चार वाजता अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कॅनाॅलशेजारून जाणाऱ्या कच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला होता. कॅनाॅलच्या शेजारून ट्रॅक्टर वळण घेत असताना पाठीमागील ट्राॅलीचे चाक अचानक घसरले. त्यामुळे ट्राॅली कॅनाॅलमध्ये कोसळली. यातच चार महिलांना आपला प्राण गमवावा लागला.