Satara: कास पठाराला संरक्षक जाळीचे तात्पुरते कुंपण घालण्यास सुरुवात, जैवविविधतेच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 04:04 PM2023-07-12T16:04:19+5:302023-07-12T16:04:52+5:30

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून अटकाव करूनही काही पर्यटक ऐकत नाहीत.

Temporary fencing of Kas Plateau begins with protective netting, measures to safeguard biodiversity | Satara: कास पठाराला संरक्षक जाळीचे तात्पुरते कुंपण घालण्यास सुरुवात, जैवविविधतेच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना

Satara: कास पठाराला संरक्षक जाळीचे तात्पुरते कुंपण घालण्यास सुरुवात, जैवविविधतेच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना

googlenewsNext

पेट्री : जैवविविधतेस धोका पोहोचत असल्याच्या कारणास्तव जागतिक वारसास्थळ कास पठारावरील तारेचे कुंपण प्रशासनाकडून गतवर्षी काढण्यात आले होते. सध्या अतिउत्साही, हुल्लडबाज, स्टंट करणाऱ्यांकडून वाहने राखीव क्षेत्रात नेऊन जैवविविधता पायदळी तुडवीत फोटोसेशन करीत असल्याने नुकसान होत आहे. कास पठार समिती, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून अटकाव करूनही काही पर्यटक ऐकत नाहीत.

सुरक्षिततेसाठी वनविभागाद्वारे फुलांचा हंगाम सुरू होण्यापूर्वी मंगळवारपासून कास पठारावरील आवश्यक राखीव क्षेत्रात चार किलोमीटर अंतर संरक्षक जाळी तात्पुरत्या स्वरुपात बसविण्यास सुरुवात केली आहे.
आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणाऱ्या कास पठारावरील दुर्मीळ रंगीबेरंगी फुले पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. पर्यटकांकडून फुलांचे नुकसान होऊ नये, यासाठी संपूर्ण परिसर तारेच्या कुंपणाने बंदिस्त केला होता. वन्यप्राणी व पाळीवप्राण्यांचा वावर पठारावर कमी होऊ लागला. मागील काही वर्षांपासून फुलांचे प्रमाण कमी दिसू लागले. दरम्यान, गतवर्षी वनविभागाकडून पठारावरील संपूर्ण तारेचे कुंपण हटविण्यात आले होते.

सद्य:स्थितीला पठारावरील संपूर्ण परिसर सुरक्षित राहावा, यासाठी समिती कर्मचारी, वनविभागाचे कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. मागील दोन आठवड्यांपासून पश्चिमेस मान्सूनने दमदार हजेरी लावल्याने हिरवागार निसर्ग, ठिकठिकाणी फेसाळणारे धबधबे पाहण्यासाठी बहुसंख्य पर्यटक कास परिसरात भेट देत आहेत. दरम्यान, काही अतिउत्साही पर्यटक, तसेच विघ्नसंतोषी आपली वाहने पठारावर राखीव क्षेत्रात नेतानाचे चित्र आहे. कंद, ऑर्किड, तसेच काही फुले उमललेली असताना ही फुले पायदळी तुडवून सेल्फी, फोटोसेशनचे चित्र आहे. दरम्यान, सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून कित्येकदा समज देऊनही काहीजणांकडून वादावादीचे प्रसंग घडत आहेत.

उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, सातारा वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण, मेढा वनक्षेत्रपाल अर्जुन गंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पठारावरील जैवविविधतेचे नुकसान होऊ नये, यासाठी वनविभागाद्वारे पूर्वीच्या उभारलेल्या खांबाचा आधार घेऊन आवश्यक ठिकाणी पठार परिसरात संरक्षक जाळीच्या मदतीने बंदिस्त करण्यास सुरुवात झाली आहे. हंगाम संपल्यानंतर पुन्हा संरक्षक जाळी काढण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली.


काहीजण दुर्मीळ फुले उमलत असणाऱ्या राखीव क्षेत्रात सुरक्षा कर्मचाऱ्यांची नजर चुकवून वाहनांसमवेत जाऊन कंद, वेली, फुले पायदळी तुडवून फोटोसेशन करणे चुकीचे आहे. उपाययोजना म्हणून पठारावरील आवश्यक, गरजेनुसार राखीव क्षेत्र तात्पुरत्या स्वरूपात संरक्षक जाळीने बंदिस्त करण्यास सुरुवात केली आहे. - अभिजित माने, परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी, मेढा

Web Title: Temporary fencing of Kas Plateau begins with protective netting, measures to safeguard biodiversity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.