चव माझ्या आईच्या हातची... 'या' हॉटेलात सैनिकांना 100 टक्के बिल माफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 17:47 IST2019-02-07T17:47:42+5:302019-02-07T17:47:51+5:30
कोल्हापूर-पुणे महामार्गावर हॉटेल महाराजा (चव आईच्या हाताची) असे नाव असलेलं हॉटेल सध्या महामार्गावरील खवय्यांसाठी लक्षवेधी ठरत आहे.

चव माझ्या आईच्या हातची... 'या' हॉटेलात सैनिकांना 100 टक्के बिल माफ
कोल्हापूर - देशातील जवानांप्रति आदर व्यक्त करण्यासाठी एका हॉटेलमालकाने चक्क सैन्यातील जवानांसाठी मोफत जेवणाची पाटीच आपल्या हॉटेलबाहेर लावली आहे. तर या हॉटेलमध्ये सैन्यातील जवानांच्या कुटुंबीयांना जेवणात 20 टक्के सवलत देण्यात येते. कोल्हापूर पुणे महामार्गावर हॉटेल महाराजा नावाने हे हॉटेल प्रसिद्ध आहे. या हॉटेलमधील सवलतींचे फलक ग्राहकांचे लक्ष आकर्षित करत असून हॉटेल मालकाप्रति आदरभावही व्यक्त करत आहे.
कोल्हापूर-पुणे महामार्गावर हॉटेल महाराजा (चव आईच्या हाताची) असे नाव असलेलं हॉटेल सध्या महामार्गावरील खवय्यांसाठी लक्षवेधी ठरत आहे. कारण, या हॉटेलमध्ये सैनिकांना 100 % सवलत, जेवणाच्या ताटात काहीही शिल्लक न ठेवल्यास बिलात 20 रुपयांची सूट. अपंग लोकांना दररोज दोनवेळा मोफत जेवण, अशी प्रेमळ आणि आपुलकीची सेवा देण्यात येत आहे. त्यामुळे हे हॉटेल ग्राहकांचे आकर्षणाचे केंद्र ठरत असून ग्राहकांकडून या सवलतींचे कौतुकही होत आहे.
कोल्हापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर सातारा शहरापासून 12 किमी अंतरावर असलेल्या या महाराजा हॉटलेच्या संचालिका, श्रीमती प्रभा जनार्दन पाटील (हॉटेल मालकांच्या मातोश्री) यांच्या संकल्पनेतून हॉटेल मालक सचिन पाटील यांनी या सेवा-सुविधा सुरू केल्या आहेत. या सवलतींसह हॉटेलमधील जेवणाची चवही उत्तम असल्याचं काहींनी म्हटलं आहे. याबाबत एका वाटसरूने आपल्या फेसबुकवर फोटो पोस्ट टाकून हॉटेल मालकासाठी 'हॅट्स ऑफ' असे लिहले आहे. विशेष म्हणजे या हॉटेलवर मद्यपान आणि मद्यपींना बंदी घालण्यात आली आहे. तसा, बोर्डही हॉटेलबाहेर लिहिण्यात आला आहे.