तलाठी शहरातून पाहतात गावचा कारभार, शेतकऱ्यांची परवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 12:40 IST2020-11-23T12:36:19+5:302020-11-23T12:40:26+5:30
talathi, satara, ruralarea पाटण तालुक्यातील तलाठ्यांची त्यांच्या सजातील उपस्थिती हा चर्चेचा विषय आहे. विभागातील अनेक गावांतील तलाठी नेमणूक असलेल्या गावात न थांबता तालुक्यावरूनच कारभार हाकत असल्याने ग्रामीण भागातील जनतेची परवड होत आहे.

तलाठी शहरातून पाहतात गावचा कारभार, शेतकऱ्यांची परवड
रामापूर : पाटण तालुक्यातील तलाठ्यांची त्यांच्या सजातील उपस्थिती हा चर्चेचा विषय आहे. विभागातील अनेक गावांतील तलाठी नेमणूक असलेल्या गावात न थांबता तालुक्यावरूनच कारभार हाकत असल्याने ग्रामीण भागातील जनतेची परवड होत आहे.
शासनाने ग्रामीण भागातील जनता, विद्यार्थ्यांचे हाल व नुकसान टाळण्यासाठी लाखो रुपये खर्च करून तलाठी सज्जे उभे केले. सोयी-सुविधायुक्त कार्यालये बांधण्यात आली. मात्र, बहुतांश तलाठी कार्यालयात बसून कारभार पाहत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या व इतर विविध कामांसाठी तलाठी कार्यालयातून सातबारा, खाते उतारा, विविध प्रकारचे दाखले आदी विविध कागदपत्रे विविध कामांसाठी लागत असतात.
शालेय विद्यार्थ्यांसह, नोकरदारांना विविध पदासाठींच्या भरती प्रक्रियेसाठी जात प्रमाणपत्र, रहिवासी, कुटुंब प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्रे महत्त्वाची ठरत असतात. मात्र ही कागदपत्रे मिळविण्यासाठी सकाळपासूनच संबंधित शेतकरी, ग्रामस्थ या तलाठ्यांचा शोध घेत असतात.
आज इथे तर उद्या तिथे अशाप्रकारे हे तलाठी घिरट्या मारत असतात. अनेक तलाठी कधी-कधी मोबाईलही बंद ठेवतात. तर त्यांचा कोतवालही ग्रामस्थांना त्याबाबत व्यवस्थित माहिती सांगत नाही. परिणामी तलाठी व कोतवाल यांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा वाया जात आहे.
अनेक गावांमध्ये खासगी क्लार्क किंवा गावचा कोतवालच तलाठ्यांची कामे करताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह, विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रांसाठी लागणारी स्वाक्षरी व कागदपत्रे घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. विशेष म्हणजे येथे आल्यानंतरही या तलाठ्यांच्या मनमानी कारभाराला त्यांना सामोरे जावे लागते. गत अनेक महिन्यांपासून तालुक्यातील सर्वच तलाठी आपल्या सज्जांचा कारभार तालुक्याच्या ठिकाणावरून हाकत असल्याचे दिसत आहे. या मनमानी कारभारावर कोणाचाच अंकुश राहिला नसल्याचे दिसत आहे.
- चौकट
कार्यालये बनली ह्यशोपीसह्ण
गावागावांत ज्याठिकाणी तलाठी कार्यालये उभारण्यात आलेली आहेत, त्याठिकाणी हे तलाठी हजर राहत नसल्याने ही कार्यालये शोभेची वस्तू बनू लागली आहेत. विद्यार्थी, शेतकऱ्यांना गावातच कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत व त्यांचे होणारे हाल थांबवावेत. संबंधितांना समज द्यावी, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.