Crime News Satara: तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तडीपार गुंडाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 12:02 IST2022-06-28T12:01:49+5:302022-06-28T12:02:47+5:30
मित्राच्या घरी वादावादी झाल्यानंतर मित्रासोबत जाऊन गुंड विपुल नलवडे याने तलवार हातात घेऊन दहशत निर्माण केली

Crime News Satara: तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तडीपार गुंडाला अटक
सातारा : तलवार हातात घेऊन सदर बझारमधील म्हाडा काॅलनीमध्ये दहशत माजविणाऱ्या तडीपार गुंडाला शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी तलवार जप्त केली आहे. मलिंगा ऊर्फ विपुल तानाजी नलवडे (वय २०, रा. करंजे, सातारा) असे अटक केलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मित्राच्या घरी वादावादी झाल्यानंतर मित्रासोबत जाऊन गुंड विपुल नलवडे याने तलवार हातात घेऊन दहशत निर्माण केली होती. मित्राच्या कुटुंबीयांना दमदाटी करत परिसरात आरडाओरडा केला होता.
विपुल नलवडे हा तडीपार असतानाही साताऱ्यात आल्याने व त्याने गोंधळ घातल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते. सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणचे कर्मचारी रात्रभर त्याचा शोध घेत होते. अखेर पहाटे तो घराजवळ आला असता पोलिसांनी दबा धरून त्याला पकडले. त्याच्याकडून पोलिसांनी तातडीने तलवार जप्त केली.
पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुधीर मोरे, पोलीस नाईक हवालदार सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, गणेश घाडगे, संतोष कचरे, गणेश भोंग यांनी या कारवाईत भाग घेतला.