सुषमा अंधारे, आगवणेंवर ५० कोटी अब्रूनुकसानीचा दावा, रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या वकिलांकडून नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 13:34 IST2025-10-28T13:33:49+5:302025-10-28T13:34:19+5:30
४८ तासांच्या आत माध्यमांसमोर लेखी माफी मागावी

सुषमा अंधारे, आगवणेंवर ५० कोटी अब्रूनुकसानीचा दावा, रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या वकिलांकडून नोटीस
फलटण : सुषमा अंधारे व जयश्री आगवणे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. याबद्दल त्यांनी ४८ तासांच्या आत माध्यमांसमोर लेखी माफी मागावी, अन्यथा ५० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला जाईल अशा आशयाची नोटीस अंधारे आणि आगवणे यांना पाठविली आहे, अशी माहिती ॲड. धीरज घाडगे यांनी सोमवारी येथे दिली.
फलटण येथे सोमवारी पत्रकार परिषदेत ॲड. धीरज घाडगे यांच्यासह ॲड. सचिन शिंदे, ॲड. नरसिंह निकम उपस्थित होते. यावेळी ॲड. घाडगे म्हणाले, ‘सुषमा अंधारे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी २७७ एफआयआर दाखल केल्याचा आरोप चुकीचा आहे. उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रात फलटण शहर व फलटण ग्रामीण पोलिसांत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या फिर्यादीवरून ऊस मुकादमाविरोधात तक्रार अथवा गुन्हा दाखल नाही. मुकादमांना उचलून आणणे, मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात देणे, अटकेनंतर अनफिट असतानाही फिटनेस सर्टिफिकेटसाठी स्थानिक डॉक्टरवर दबाव आणणे, त्यात आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचा समावेश असणे असा एकही प्रसंग घडला नाही.
आरोपीने पोलिसांकडून मारहाण झाल्याची कोणतीही तक्रार न्यायालयाकडे केली नाही. सुषमा अंधारे ज्यांच्या सोबत बसलेल्या आहेत, त्या जयश्री दिगंबर आगवणे मोक्कामधल्या आरोपी असून त्यांनी फलटण पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे. सुषमा अंधारे स्वतःचा पॉलिटिकल अजेंडा राबवण्यासाठी आल्या होत्या, की मृत डॉक्टरप्रती सहानुभूतीसाठी गेल्या होत्या, की पुण्यातच बसून नाईक-निंबाळकरांची बदनामी करण्यासाठी आल्या, असा सवालही ॲड. घाडगे यांनी केला.
या आरोपांचेही वकिलांकडून खंडन
रणजितसिंह यांच्या त्रासामुळे नंदकुमार ननावरे यांनी आत्महत्या केल्याचे वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केले आहे. परंतु, त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेली व्यक्ती असल्याचे त्यांचे बंधू धनंजय ननावरे यांनी सत्र न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले आहे. तसेच त्यांनी कोणत्याही बँकेचे कर्ज घेतलेले नसल्याने कोणत्या बँका बुडवल्या हे त्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हानही ॲड . घाडगे यांनी यावेळी दिले.