‘सूरज शेळके अमर रहे...’शहिद जवानास साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 03:51 PM2022-06-26T15:51:55+5:302022-06-26T16:01:07+5:30

Soldier Last journey : प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना त्वरित त्यांच्या जवळच्या आर्मीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांची प्राणज्योत मालवली. ही बातमी त्यांचे छोटे बंधू गणेश यांना दूरध्वनीवरून सांगण्यात आली.

‘Suraj Shelke Amar Rahe ...’ with watery eyes last message to the martyred soldier | ‘सूरज शेळके अमर रहे...’शहिद जवानास साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

‘सूरज शेळके अमर रहे...’शहिद जवानास साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

Next

खटाव : लडाखमध्ये देशसेवा बजावत असताना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे खटावमधील जवान सूरज शेळके (वय २३) यांना वीरमरण आले होते. त्यांचे पार्थिव शनिवारी रात्री दहा वाजता त्यांचे पार्थिव खटावमध्ये आणण्यात आले. रात्री उशिरा त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.
सूरज शेळके २०१८ मध्ये सैन्यदलात भरती झाले होते. अतिशय शांत, संयमी तसेच समजूतदार, परिस्थितीची जाण असणारा अशी त्यांची मित्र परिवार व समाजात ओळख होती. सूरज शेळके हे सध्या लडाख येथे १४१ फिल्ड रेजिमेंटमध्ये लान्स नाईक या पदावर कार्यरत होते. सेवा बजावत असताना त्यांना गुरुवारी अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागला. प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना त्वरित त्यांच्या जवळच्या आर्मीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांची प्राणज्योत मालवली. ही बातमी त्यांचे छोटे बंधू गणेश यांना दूरध्वनीवरून सांगण्यात आली.

ही माहिती मिळाल्यानंतर जवान सूरज शेळके यांच्या पार्थिवाचे आतुरतेने वाट पाहणाऱ्या खटावमधील ग्रामस्थांनी उस्फूर्तपणे खटाव बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांचे पार्थिव शनिवारी सर्वप्रथम सोमनाथनगर येथील त्यांच्या राहत्या घरासमोर आणण्यात आले. यावेळी सूरज यांच्या आई सुवर्णा व लहान भाऊ गणेश यांनी हंबरडा फोडला. यामुळे उपस्थित असलेल्या अनेकांना अश्रू आवरता आले नाहीत. सर्वजण या जवानाच्या अकाली जाण्याने हेलावून गेले होते. यावेळी ‘सूरज शेळके अमर रहे...’, ‘भारत माता की जय...’, ‘जबतक सूरज चांद रहेगा, सूरज तुम्हारा नाम रहेगा...’ या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. सोमनाथनगर येथील त्यांच्या राहत्या घरासमोर असलेल्या मोकळ्या मैदानात शोकाकुल वातावरणात यांच्यावर शासकीय इतमामात बंदुकीच्या फैरी झाडून अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्ययात्रा मार्गात रांगोळी काढून फुलांचा वर्षाव करत त्यांच्या अंतिम प्रवासाला साश्रू नयनाने निरोप दिला. मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या अंत्ययात्रेत महिला, तरुण तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. अंत्यसंस्काराच्या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पार्थिवाला सूरज यांचे छोटे बंधू गणेश शेळके यांनी मुखाग्नी दिला.

सूरज यांची घरची परिस्थिती बेताचीच होती. त्यांची आई सुवर्णा या मोलमजुरी करतात. वडील मिठाईच्या दुकानात काम करतात. अशा हलाखीच्या परिस्थितीत या कुटुंबातून अवघ्या चार वर्षांपूर्वी भरती झालेल्या सूरज यांच्या सैन्य दलातील भरतीमुळे कुटुंबाची बसलेली घडी नियतीने विस्कटल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: ‘Suraj Shelke Amar Rahe ...’ with watery eyes last message to the martyred soldier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.