Satara News: शिक्षकाची बदली थांबविण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर; भर पावसात मांडला ठिय्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 14:14 IST2023-06-28T14:14:31+5:302023-06-28T14:14:58+5:30
शालेय प्रगतीवर आधारित गेली सलग दोन वर्षे त्यांना संस्थेचा सातारा-पुणे विभागीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाला

Satara News: शिक्षकाची बदली थांबविण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर; भर पावसात मांडला ठिय्या
पिंपोडे बुद्रुक : गेल्या सोळा वर्षांपासून एकाच शाळेत विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करत विद्यार्थ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांमध्ये शैक्षणिक व सामाजिक ऋणानुबंध निर्माण झालेल्या सुधाकर शिंदे या शिक्षकाचीबदली रद्द करावी, अशी मागणी करत बनवडी, ता. कोरेगाव येथील रयत शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी भर पावसात रस्ता रोको करून शिंदे सरांची बदली रद्द झालीच पाहिजे अशा घोषणा देत ठिय्या केला.
बनवडी, ता. कोरेगाव येथील रयत शिक्षण संस्थेत शिक्षक सुधाकर शिंदे गेल्या सोळा वर्षांपासून कार्यरत आहेत. ते दररोज शालेय वेळेसह जवळपास बारा तासांपेक्षा जास्त वेळ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बहुसंख्य विद्यार्थ्यांनी अभ्यासासह, खेळामध्ये विशेष प्रावीण्य मिळविले असून शालेय प्रगतीवर आधारित गेली सलग दोन वर्षे त्यांना संस्थेचा सातारा-पुणे विभागीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी संस्थेकडून शिंदे यांच्या बदलीचे पत्र मिळाले. याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाल्यानंतर त्यांची बदली रद्द व्हावी यासाठी विद्यार्थी आक्रमक झाले. त्यासाठी विद्यार्थ्यांनी भर पावसामध्ये बदली रद्द व्हावी यासाठी घोषणा देत रस्ता रोको केला.
दरम्यान, विद्यार्थ्यांची आक्रमकता लक्षात घेत बनवडी गावातील पदाधिकाऱ्यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये धाव घेत संबंधित बदली रद्द व्हावी अशी मागणी केली आहे; परंतु संस्थेचे सचिव कार्यालयीन कामानिमित्त बाहेरगावी असल्याने गावातील पदाधिकाऱ्यांना कोणत्याही आश्वासनाशिवाय परतावे लागले.
बदली रद्द करा...इथेच बढती द्या
शिंदे सरांची बदली रद्द व्हावी ही आमची मागणी असून ती मान्य न झाल्यास आम्ही आणखी आक्रमकपणे आंदोलन करणार आहोत. त्यासाठी त्यांची बदली रद्द करुन त्यांना याच शाळेत बढती द्यावी अशी मागणी येथील विद्यार्थी व पालकांकडून होत आहे.
शिंदे सर यांच्या परिश्रमातून शालेय तासांशिवाय रात्र अभ्यासिका,उन्हाळी वर्ग या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सातत्य ठेवल्यामुळे या हायस्कूलच्या प्रगतीचा आलेख कायम चढता राहिला आहे.विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन प्रशासनाने त्यांची बदली रद्द करावी अशी पालकांची मागणी आहे. -मनोज गाढवे, सामाजिक कार्यकर्ते बनवडी.
गेले सोळा वर्षे या ठिकाणी ज्ञानार्जन करत असून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत आहे. यामध्ये पालकांचे देखील मोठे सहकार्य लाभले आहे. त्यामुळे येथील प्रत्येक विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबीयांशी ऋणानुबंध जोडले आहेत. - सुधाकर शिंदे, शिक्षक,बनवडी.