गुणवत्तेबाबत प्रश्नचिंन्ह : गोंदवलेत वीज वाहक तारांनी घेतला पेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 15:17 IST2021-02-25T15:14:32+5:302021-02-25T15:17:51+5:30
Religious Places Satara -गोंदवले बुद्रुक येथील ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर समाधी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रांग असतानाच अवघ्या काही फुटांवर वीज वाहक तारेने अचानक पेट घेतला. काही वेळेत आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे काहि काळ सर्वांचीच घाबरगुंडी उडाली.

गुणवत्तेबाबत प्रश्नचिंन्ह : गोंदवलेत वीज वाहक तारांनी घेतला पेट
म्हसवड : गोंदवले बुद्रुक येथील ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर समाधी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रांग असतानाच अवघ्या काही फुटांवर वीज वाहक तारेने अचानक पेट घेतला. काही वेळेत आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे काहि काळ सर्वांचीच घाबरगुंडी उडाली. दरम्यान ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. महामार्ग ठेकेदार व वीज कंपनीच्या अडमुठपणामुळे जीवितास धोका असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गोंदवले बुद्रुक येथे मोहोळ-सातारा महामार्गाचे काम सुरू आहे. या कामांतर्गत रस्त्यालगत नव्याने विजेचे खांब व तारा टाकण्यात आल्या आहेत. परंतु हे काम महामार्ग ठेकेदार व वीज कंपनीने मनमानीपणे केले आहे. येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिराला लागून असलेल्या संरक्षक भिंतीला लागून उभारण्यात आलेल्या खांबांवर हलक्या प्रतीच्या विजेच्या तारा टाकण्यात आल्या आहेत.
या ठिकाणी भाविकांची संख्या मोठी व नागरिकांची वर्दळ मोठ्याप्रमाणावर असल्याने चांगल्या प्रतीच्या तारा टाकण्यात याव्यात असा आग्रह ग्रामस्थांनी केला होता. परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास समाधी मंदिरात भाविक रांगेतून दर्शन घेत होते. मंदिरापासून अगदी काही फुटांवर असलेल्या संरक्षण भिंतीवरून गेलेल्या वीजवाहक तारेने अचानक पेट घेतला.
शॉर्टसर्किटमुळे झालेल्या मोठ्या आवाजाने रस्त्यावरील लोकांनी मंदिराच्या दिशेने धाव घेतली. काही फुटांवर आगीचे लोट पडू लागल्याने भाविकही घाबरून पळाले. दरम्यान मनसेचे जिल्हाध्यक्ष घटनास्थळी पोहचले. बारदानच्या साह्याने ही आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. वीजप्रवाह सुरू असल्याने आगीने अधिकच पेट घेतल्याने ते जखमी झाले.
काही नागरिकांनी विद्युत जनित्रच्या फ्यूज काढल्याने ही आग विझविण्याचा यश आले. तोपर्यंत सुमारे सातशे ते आठशे फुटांपर्यंतच्या वीज वाहक तारा जाळून खाक झाली. ही आग वेळीच आटोक्यात आली नसती तर लोकवस्तीत आग पसरण्याची भीती होती. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
या घटनेची कल्पना देऊनही संबंधित यंत्रणा घटनास्थळी न पोचल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता. तब्बल अठरा तासानंतर संबंधित ठेकेदार व वीज कंपनीचे अधिकारी घटनास्थळी पोहचले.
निकृष्ठ वीज वाहक तारा
महामार्ग ठेकेदार व वीज वितरण कंपनीच्या संगनमताने निकृष्ठ वीज वाहक तारा टाकल्यानेच मंदिर परिसरात आग लागण्याची घटना घडली आहे. जीवित हानी झाल्यावर संबंधित विभागाला जाग येणार आहे का असा प्रश्न मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी उपस्थित केला आहे.