पुण्याला बदली होत नाही, म्हणून एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; महाबळेश्वरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 13:46 IST2025-09-25T13:44:41+5:302025-09-25T13:46:14+5:30
बसस्टँडच्या दुसऱ्या मजल्यावरील पत्र्यावर चढले

छाया : अजित जाधव
महाबळेश्वर : पुण्यात बदली होत नाही, म्हणून एसटीच्या वर्कशाॅपमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने बसस्टँडच्या दुसऱ्या मजल्यावरील पत्र्यावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. आगारातील कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे अनुचित प्रकार टळला. हा प्रकार बुधवारी सायंकाळी सहा वाजता घडला.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, अशोक शंकर संकपाळ (वय ४४, रा.भोलावडे, ता.भोर जि.पुणे) हे महाबळेश्वर आगारात काम करत आहेत. त्यांची पुण्याला बदली होत नाही, म्हणून त्यांनी महाबळेश्वर आगार येथे अर्ज केला आहे, परंतु बदलीचे अधिकार सातारा येथील विभागीय नियंत्रक यांच्याकडे असल्याचे संकपाळ सांगितले, तसेच याबाबत त्यांना नोटीसही काढली. मात्र, नोटीस न स्वीकारता बदली न झाल्यास तीन तासांत आत्महत्या करतो, असा लेखी अर्ज करत संकपाळ यांनी आगाराच्या दुसऱ्या मजल्यावरील पत्र्यावर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत, यावेळी रुग्णवाहिका, पालिकेचे अग्निशमन बचाव दल घटनास्थळी दाखल झाले. पोलिस हवालदार संतोष शेलार व आगारातील कर्मचाऱ्यांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. शेवटी एका कर्मचाऱ्याने त्यांची समजूत काढल्यानंतर संकपाळ यांना सुरक्षित खाली उतरविण्यात आले.