Satara: क्रिकेट खेळायला जातो म्हणून मुलगा घरातून गेला, दिवसभर शोधूनही नाही सापडला; आई चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 16:17 IST2025-08-07T16:17:04+5:302025-08-07T16:17:35+5:30
काैटुंबीक परिस्थिती आणि शिक्षण घेण्याची इच्छा होत नसल्याने मुले घर सोडत असल्याचे पोलिसांचे म्हणणे

Satara: क्रिकेट खेळायला जातो म्हणून मुलगा घरातून गेला, दिवसभर शोधूनही नाही सापडला; आई चिंतेत
सातारा : मुलांसोबत क्रिकेट खेळण्यास जातो, असे सांगून एका १७ वर्षाच्या तरुणाने घर सोडलं असून, त्याची आई चिंतेत आहे. आपल्या मुलाला शोधून आणावे, अशी मागणी करत आईने शाहूपुरी पोलिस ठाण्यात मुलगा गायब झाल्याची तक्रार नोंदवली आहे.
युवराज भिमा साळुंखे (वय १७, रा. मंगळवार पेठ, सातारा) असे घरातून निघून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. युवराज हा दहावी उत्तीर्ण झाला आहे. मात्र, अद्याप त्याने अकरावीला ॲडमिशन घेतले नाही. त्याला क्रिकेट खेळण्याची प्रचंड आवड आहे. रविवारी सकाळी साडेअकरा वाजता तो मुलांसोबत क्रिकेट खेळायला जातो, असे सांगून घरातून निघून गेला. मात्र, संध्याकाळी तो घरी परत न आल्याने त्याच्या आईला काळजी वाटली. आई घरकामात असल्यामुळे मुलगा क्रिकेट खेळत असेल, असे वाटले. परंतु अंधार पडल्यानंतर आईच्या चिंतेत अधिकच भर पडली.
माची पेठेतील काळ्या दगडाजवळील मैदानावर मुले नेहमी क्रिकेट खेळतात. त्या ठिकाणी आई गेली. युवराज आला होता का, अशी त्याच्या मित्रांकडे आईने चाैकशी केली. त्यावेळी आपला मुलगा काळ्या दगडाजवळील मैदानात आला नसल्याचे आईला समजले. शाळेतील कोणत्या मित्राकडे आपला मुलगा गेला आहे का, याचीही आईने माहिती घेतली.
घरात कसलाही वाद नाही. असे असताना तो घरातून का निघून गेला, या चिंतेने आईला ग्रासले. दुसऱ्या दिवशी दिवसभर पै पाहुणे, त्याच्या मित्रांकडे आईने व त्याच्या मोठ्या भावाने शोध घेतला. परंतु तो सापडला नाही. सरतेशेवटी त्याच्या आईने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन आपला मुलगा गायब झाल्याची तक्रार नोंदवली. महिला पोलिस हवालदार कांबळे या अधिक तपास करीत आहेत.
शिक्षण घेण्याची इच्छा होत नाही
अलीकडे अवघ्या १४ ते १७ वर्षांखालील अल्पवयीन मुले घर सोडत असल्याने पालक हतबल होत आहेत. घरात काहीही वाद नसताना मुले घर सोडून जात आहेत. काैटुंबीक परिस्थिती आणि शिक्षण घेण्याची इच्छा होत नसल्याने मुले घर सोडत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.