दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाने केला वडिलांचा खून, साताऱ्यातील खळबळजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 04:21 PM2023-03-13T16:21:05+5:302023-03-13T16:22:10+5:30

यात्रेच्या पूर्वसंध्येलाच खुनाची घटना घडल्याने यात्रेवर शोककळा पसरली

Son killed his father for not paying for alcohol in Jakhinwadi Karad Satara district | दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाने केला वडिलांचा खून, साताऱ्यातील खळबळजनक घटना

दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाने केला वडिलांचा खून, साताऱ्यातील खळबळजनक घटना

googlenewsNext

मलकापूर : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून वयोवृद्ध वडिलांच्या डोक्यात पहार घालून हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना कऱ्हाड तालुक्यातील जखिणवाडी येथे शनिवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली. रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशीच गावात यात्रा असते. यात्रेच्या पूर्वसंध्येलाच खुनाची घटना घडल्याने यात्रेवर शोककळा पसरली आहे.

शिवाजी नारू नलवडे-पाटील (वय ६२), असे खून झालेल्या पित्याचे नाव आहे, तर अर्जुन शिवाजी पाटील (३७), असे संशयित मुलाचे नाव आहे.

याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कऱ्हाड तालुक्यातील जखिणवाडी येथे गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामागे शिवाजी नारू नलवडे-पाटील यांचे घर आहे. घरात शिवाजी पाटील यांच्यासह पत्नी रंगूबाई, मुलगा अर्जुन व मयत मुलीची दोन मुले असे कुटुंब वास्तव्यास आहे. मुलगा अर्जुन हा अविवाहित असून, तो अनेक दिवसांपासून व्यसनाधीन झालेला आहे. दारूसाठी पैसे मागण्यावरून कुटुंबात वारंवार कलह होत असे. 

शनिवारी रात्री अर्जुन पाटील याने दारूसाठी पैसे मागितले. वडिलांनी पैसे न दिल्याने चिडून जाऊन अर्जुनने वडील शिवाजी नारू नलवडे-पाटील यांच्या डोक्यात लोखंडी पहार घालून गंभीर जखमी केले. यावेळी झालेल्या आरडा-ओरड्यामुळे शिवाजी पाटील यांचे नातू जागे झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आजोबांना गावातील ग्रामस्थांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना थोड्या वेळातच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कऱ्हाड शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी संशयित मुलगा अर्जुन पाटील यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशीच गावात मळाईदेवीचा रंगोत्सव असतो, तर दोन दिवस गावाची यात्रा असते. यात्रेच्या पूर्वसंध्येलाच झालेल्या या खुनामुळे जखिणवाडीत खळबळ उडाली आहे.

आजीची जबाबदारी पडली नातवावर...

जखिणवाडीत शिवाजी पाटील यांचा मुलानेच खून केला. त्यांचा दुसरा मुलगा कुटुंबासह कामानिमित्त मुंबईत आहे. घरातील अर्जुनच्या त्रासामुळे तो गावाकडे येण्याचे टाळत होता. त्यामुळे आता घरात केवळ आजी आणि एक २२ वर्षांचा व एक १४ वर्षांचा नातू राहिले आहेत. साठीच्या वर्षांच्या आजीचा सांभाळ करण्याची जबाबदारी आता त्याच्यावर आली आहे.

Web Title: Son killed his father for not paying for alcohol in Jakhinwadi Karad Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.