...म्हणून उदयनराजेंच्या पक्षप्रवेशाला पंतप्रधान गैरहजर राहिले; मुख्यमंत्र्यांनी सांगितले खरे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 13:21 IST2019-09-16T10:53:35+5:302019-09-16T13:21:35+5:30
मुख्यमंत्र्यांनी आज कराड येथे पत्रकार परिषद घेतली त्यावेळी उदयनराजेंच्या पक्षप्रवेशाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहिले नाहीत असा प्रश्न विचारण्यात आला.

...म्हणून उदयनराजेंच्या पक्षप्रवेशाला पंतप्रधान गैरहजर राहिले; मुख्यमंत्र्यांनी सांगितले खरे कारण
कराड - बहुचर्चित असलेला सातारचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजपा पक्षप्रवेश अखेर पार पडला. खासदारकीचा राजीनामा देत राजेंनी भाजपाची वाट धरली. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज भाजपात प्रवेश करणार म्हणून उदयनराजेंचा पक्षप्रवेश दिल्लीत ठेवण्यात आला. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत उदयनराजे भोसले भाजपात प्रवेश करतील असं सांगण्यात आलं होतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कार्यक्रमाला गैरहजेरी लावली यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी आज कराड येथे पत्रकार परिषद घेतली त्यावेळी उदयनराजेंच्या पक्षप्रवेशाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहिले नाहीत असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधानांना कुठल्याही राजकीय पक्षप्रवेशाला उपस्थित राहता येत नाही. हा राजकीय शिष्टाचार आहे. त्यामुळे उदयनराजेंच्या पक्षप्रवेशाला नरेंद्र मोदी आले नाहीत अशी माहिती त्यांनी दिली
स्वत: उदयनराजेंनी सोशल मीडियावरुन भाजपा प्रवेशाबाबत जाहीर केलं होतं. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश करणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र प्रत्यक्षात उदयनराजेंच्या भाजपा पक्षप्रवेशावेळी केंद्रीय मंत्री अमित शहा आणि जे.पी नड्डा उपस्थित होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती नसल्याने याबाबत विविध चर्चेंना उधाण आलं होतं.
पक्ष प्रवेशापूर्वीच्या उदयनराजे यांच्या अटी चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. यामध्ये भाजप प्रवेशावेळी पंतप्रधान मोदींनी उपस्थित राहावे आणि सातारा लोकसभा मतदार संघाची निवडणूक विधानसभेसोबत व्हावी या दोन अटींचा समावेश होता. त्या भाजपने मान्य केल्याचे सांगण्यात येत होते. पंतप्रधान मोदींच्या उपस्थित भाजपामध्ये प्रवेश करण्याची उदयनराजे यांची इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यात येईल, असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होते. परंतु, उदयनराजे यांच्या पक्ष प्रवेशावेळी पंतप्रधान मोदी उपस्थित नव्हते. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना याबाबत खुलासा करावा लागला आहे.