Satara Crime: बारबाला आणल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा, पाचगणी येथील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 16:45 IST2025-11-05T16:44:49+5:302025-11-05T16:45:10+5:30
१८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त

संग्रहित छाया
पाचगणी : पाचगणीजवळील खिंगर (ता. महाबळेश्वर) येथे बंगल्यावर गायिका व ‘महिला वेटर’च्या नावाखाली बारबालांना आणून अश्लील हावभाव करून नृत्य केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. पाचगणी पोलिसांनी संबंधित ‘वर्षा व्हिला’ बंगल्यावर छापा मारून हॉटेल मालकासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला तसेच १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पाचगणी पोलिसांना खिंगर येथील वर्षा व्हिला या बंगल्यात बारबाला आणून अश्लील नृत्य केले जात असल्याची माहिती मिळाली. यानंतर पाचगणी पोलिसांनी दि. ४ रोजी पहाटे १:१५ च्या सुमारास बंगल्यावर छापा मारला. पथकाने मुख्य हॉलमध्ये पाहणी केली असता, हॉटेल मालकाने वेगवेगळ्या ठिकाणांहून आणलेल्या ६ बारबाला कमी कपड्यांमध्ये सुमारे ५ ते ७ गिऱ्हाईकांसमोर उभे राहून अश्लील हावभाव करीत नृत्य करताना दिसल्या. यानंतर पोलिसांनी हॉटेल मालकासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला.
ही कारवाई स.पो.नि. दिलीप पवार, साहाय्यक फौजदार कैलासनाथ रसाळ, हवालदार श्रीकांत कांबळे, हवालदार विठ्ठल धायगुडे, उमेश लोखंडे, व्ही.यू. नेवसे, महिला पोलिस कॉन्स्टेबल श्रुती गोळे यांनी केली.
१८.८० लाखांचा मुद्देमाल जप्त
खिंगर येथील छाप्यात घटनास्थळावरून पोलिसांनी साऊंड सिस्टीम, लाईट सिस्टीम, मोबाइल, डीव्हीआर आणि एक कार असा एकूण १८.८० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.