Satara: परतीच्या वाटेवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा फलटणमध्ये मुक्काम!, आळंदीत कधी पोहचणार..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 13:43 IST2025-07-14T13:43:02+5:302025-07-14T13:43:26+5:30

दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Shri Sant Shrestha Dnyaneshwar Maharaj Palkhi Ceremony stops at Phaltan on the way back | Satara: परतीच्या वाटेवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा फलटणमध्ये मुक्काम!, आळंदीत कधी पोहचणार..जाणून घ्या

Satara: परतीच्या वाटेवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा फलटणमध्ये मुक्काम!, आळंदीत कधी पोहचणार..जाणून घ्या

फलटण : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा परतीच्या मार्गावर रविवार, दि. १३ रोजी सायंकाळी नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिर, रविवार पेठ, फलटण येथे मुक्कामी आला होता. नेहमी आषाढ वद्य चतुर्थीस फलटण परतीच्या मुक्कामी येणारा सोहळा यावर्षी एक दिवस अगोदर आषाढ वद्य तृतीयेस फलटण मुक्कामी आला होता. यावेळी शहरासह तालुक्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली होती.

संत शिरोमणी ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्याने आषाढी वारीसाठी दि. १९ जून रोजी आळंदीहून प्रस्थान केले होते. पंढरपूर येथे आषाढी एकादशीनंतर परतीच्या वाटेवर सोहळा गुरुवार, दि. १० जुलै रोजी पंढरपूर येथून आळंदीकडे मार्गस्थ झाला, शुक्रवार, दि. ११ रोजी वेळापूर मुक्काम, शनिवार, दि. १२ रोजी नातेपुते मुक्काम झाला.

रविवार, दि. १३ जुलै रोजी धर्मपुरी व साधूबुवा ओढा येथे सकाळचा विसावा, बरड, पिंप्रद, विडणी येथे दुपारचा विसावा आणि रात्री नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिर, फलटण येथे मुक्कामी आली होती. सोमवार, दि. १४ जुलै रोजी सकाळी निंभोरे ओढा, सुरवडी, दत्त मंदिर, काळज येथे विसावा, तरडगाव येथे दुपारचा विसावा आणि लोणंद पूल फाटा येथून सोहळा रात्री पाडेगाव मुक्कामी थांबणार आहे.

मंगळवार, दि. १५ रोजी वाल्हे, बुधवार, दि. १६ रोजी सासवड, गुरुवार, दि. १७ रोजी हडपसर, शुक्रवार, दि. १८ रोजी भवानी पेठ, पुणे, शनिवार, दि. १९ रोजी पुणे, रविवार, दि. २० रोजी आळंदी आणि सोमवार, दि. २१ रोजी सोहळा संत शिरोमणी ज्ञानेश्वर मंदिर येथे मुक्कामी पोहोचणार आहे.

फलटणमधील भक्तांनी रात्री उशिरापर्यंत माउलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. शेजारील गावातून मोठ्या प्रमाणात महिला, तरुण व नागरिक दर्शनासाठी आले होते. एक दिवसाच्या मुक्कामानंतर पालखी पुढच्या मुक्कामी मार्गस्थ होणार आहे.

रस्त्याच्या दुतर्फा माउली भक्तांची गर्दी..

वारीच्या परतीच्या मार्गावरील फलटणला तिसरा मुक्काम असतो. माळशिरस येथून पालखी नातेपुते मार्गे फलटणला पोहचली असून, पालखीसोबत नगारखाना व विणेकरी यांची गर्दी पाहायला मिळाली. पालखीचे स्वागत फलटण येथे क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे भाविकांनी प्रचंड गर्दीत केली होती. रस्त्याच्या दुतर्फा माउली भक्तांची गर्दी झाली होती. नाना पाटील चौक मार्गे पालखी छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे श्री विठ्ठल मंदिर येथे मुक्कामासाठी पोहोचली आहे.

Web Title: Shri Sant Shrestha Dnyaneshwar Maharaj Palkhi Ceremony stops at Phaltan on the way back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.