पुणे-बंगळुरू महामार्गावर भुईंजजवळ शिवशाही बस पेटली; अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 16:22 IST2025-07-28T16:21:45+5:302025-07-28T16:22:12+5:30
प्रवाशांनी खचाखच भरलेली होती बस

पुणे-बंगळुरू महामार्गावर भुईंजजवळ शिवशाही बस पेटली; अनर्थ टळला
सातारा : पुणे-बंगळुरू महामार्गावर वाई (ता. भुईंज) येथे कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या शिवशाही बसला अचानक आग लागली. यानंतर काही मिनिटांतच बस या आगीत जळून खाक झाली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. ही घटना रविवारी सकाळी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोल्हापूरहून पुण्याला शिवशाही बस (एमएच ०६ बीडब्ल्यू ३५२३) निघाली होती. ही बस प्रवाशांनी खचाखच भरलेली होती. वाई तालुक्यातील भुईंज येथील बदेवाडी गावाजवळ आल्यानंतर बसच्या डाव्या बाजूच्या चाकाजवळ आग लागल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. यानंतर तातडीने बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. पाहता-पाहता बसने पेट घेतला. संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या आगीत बसचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
यावेळी भुईंज कारखान्याचे अग्निशामक दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत बस जळून खाक झाली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप समोर आलेले नाही. भुईंज पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.