सातारा नगरपालिकेत सत्तासंघर्ष; स्थानिक आघाड्या अन् मनोमिलन!, शिवेंद्रसिंहराजे गटाला १० वर्षांनी नगराध्यक्षपदाची संधी

By नितीन काळेल | Updated: November 18, 2025 19:07 IST2025-11-18T19:06:46+5:302025-11-18T19:07:25+5:30

Local Body Election: बैठकावर बैठका; निर्णय शेवटच्या दिवशीच...

Shivendrasinh Raje group gets chance to become mayor in Satara Municipality after 10 years | सातारा नगरपालिकेत सत्तासंघर्ष; स्थानिक आघाड्या अन् मनोमिलन!, शिवेंद्रसिंहराजे गटाला १० वर्षांनी नगराध्यक्षपदाची संधी

सातारा नगरपालिकेत सत्तासंघर्ष; स्थानिक आघाड्या अन् मनोमिलन!, शिवेंद्रसिंहराजे गटाला १० वर्षांनी नगराध्यक्षपदाची संधी

नितीन काळेल

सातारा : सातारा नगरपालिका निवडणुकीचा मागील २५ वर्षांचा इतिहास पाहिला तर संघर्ष, स्थानिक आघाड्या अन् आता मनोमिलनानंतर एकत्र लढाई असा प्रवास राहिला आहे. पण, आताच्या निवडणुकीत सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने भाजपकडून नगराध्यक्षपद मिळविण्यात बाजी मारली आहे. यामुळे तब्बल १० वर्षांनी शिवेंद्रसिंहराजे गटाला संधी मिळाली.

सातारा नगरपालिकेच्या मागील काही निवडणुका या स्थानिक आघाड्यातच लढल्या गेल्या. येथील सत्ता दोन्ही राजे यांच्यामध्येच राहिली. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा विकास आघाडी आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची नगरविकास आघाडी असा हा सामना गत पंचवार्षिक निवडणुकीत होता. दोन्ही राजे हे एकाच पक्षात असले तरीही आघाड्यातूनच लढत होते.

२०१६च्या निवडणुकीत मनोमिलन तुटले अन् दोघेही स्वतंत्र आघाडीतून लढले. त्यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाच्या माधवी कदम या नगराध्यक्षा झाल्या. कदम यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. दरम्यानच्या काळात दोन्ही राजे भाजपमध्ये गेले. आताच्या पालिका निवडणुकीत भापजकडूनच पक्ष चिन्हावर निवडणूक लढवावी, असे स्पष्ट झाल्याने दोघेही एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जाताना दिसत आहेत.

बैठकावर बैठका; निर्णय शेवटच्या दिवशीच...

सातारा पालिकेची सूत्रे ही दोन्ही राजे गटाकडेच आलटून-पालटून राहिली आहेत. आताच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उमेदवार निश्चितीसाठी अनेक बैठका घेतल्या, पण नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोणाचा यावर शिक्कामोर्तब होत नव्हते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच नगराध्यक्षपदाचे नाव जाहीर झाले. माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या नावावर मोहोर उमटली आहे.

२००६च्या निवडणुकीनंतर मनोमिलन...

२००६मध्ये नगरपालिकेची निवडणूक झाली होती. दोन्ही आघाड्याही स्वतंत्र लढल्या, पण त्यानंतर सत्तेसाठी दोघे एकत्र आले. त्यावेळी नगराध्यक्षपद वाटून घेण्यात आले. सुरुवातीला शिवेंद्रसिंहराजे गटाचे डाॅ. अच्युत गोडबोले नगराध्यक्ष झाले. त्यानंतर सात नगराध्यक्ष झाले. कधी खासदार उदयनराजे भोसले, तर कधी मंत्री शिवेंद्रसिंहराजे गटाचे हे नगराध्यक्ष होते.

२०११ च्या निवडणुकीतही एकत्र...

२०११ च्या डिसेंबर महिन्यात सातारा पालिकेची निवडणूक झाली. या निवडणुकीत दोन्ही राजे एकत्र आले होते. तसेच त्यानंतर दोन्हीही गटाचे नगराध्यक्ष झाले. २०१६ पर्यंतच्या पाच वर्षांच्या काळात चाैघांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली.

२०१६ ची निवडणूक आघाड्यावर...

२०१६ च्या निवडणुकीत मनोमिलन तुटले. त्यामुळे दोन्हीही आघाड्या स्वतंत्रपणे लढल्या. यामध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक लोकनियुक्त होती. यामध्ये उदयनराजे भोसले गटाच्या माधवी कदम नगराध्यक्षा झाल्या. डिसेंबर २०२१ मध्ये पंचवार्षिक कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर पालिकेची निवडणूक झालीच नाही. त्यामुळे पाच वर्षांपासून पालिकेवर प्रशासक राजवट आहे.

२००६ पासून नगराध्यक्षांची कारकीर्द...

  • डाॅ. अच्युत गोडबोले १७ डिसेंबर २००६ ते १० मार्च २००८
  • निशांत पाटील १७ मार्च २००८ ते ७ मे २००९
  • नासिर शेख ८ मे २००९ ते १६ जून २००९
  • वैशाली महामुने २० जून २००९ ते ४ मार्च २०१०
  • सुजाता भोसले १५ मार्च २०१० ते २ ऑगस्ट २०१०
  • कविता देगावकर १२ ऑगस्ट २०१० ते २३ सप्टेंबर २०१०
  • सुजाता गिरीगोसावी ४ ऑक्टोबर २०१० ते २७ जानेवारी २०११
  • स्मिता घोडके ५ फेब्रुवारी २०११ ते १६ डिसेंबर २०११
  • मुक्ता लेवे २ डिसेंबर २०११ ते २१ मार्च २०१३
  • सुजाता राजेमहाडिक २ एप्रिल २०१३ ते १४ जुलै २०१४
  • सचिन सारस १४ जुलै २०१४ ते ३ ऑक्टोबर २०१५
  • विजय बडेकर १४ ऑक्टोबर २०१५ पासून...
  • माधवी कदम २२ डिसेंबर २०१६ ते २६ डिसेंबर २०२१


अमोल मोहिते, सुवर्णा पाटील यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी

सातारा : सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी कोणाला मिळणार या चर्चांना सोमवारी पूर्णविराम मिळाला. भाजपकडून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निष्ठावान शिलेदार अमोल मोहिते तर महाविकास आघाडीकडून सुवर्णा पाटील यांना ही उमेदवारी बहाल करण्यात आली. या निवडीनंतर उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर केले.

Web Title : सतारा नगरपालिका में सत्ता संघर्ष: स्थानीय गठबंधन, पुनर्मिलन, और दशक का मौका!

Web Summary : सतारा नगरपालिका में सत्ता परिवर्तन। शिवेंद्रसिंहराजे समूह ने दस साल बाद महापौर पद हासिल किया, बदलते गठबंधनों और राजनीतिक गुटों के बीच पुनर्मिलन के बीच।

Web Title : Satara Municipality Power Struggle: Local Alliances, Reunions, and a Decade's Chance!

Web Summary : Satara Municipality sees power shifts. Shivendrasinharaje's group secured the mayor post after ten years, amidst changing alliances and reunions between political factions.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.