शिवेंद्रराजे म्हणतात उदयनराजे नाराज नाहीत; उदयनराजे म्हणाले, ‘माझा एकच नाराजीचा मुद्दा होता’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 21:11 IST2025-12-03T21:10:46+5:302025-12-03T21:11:38+5:30
Local Body Election:उदयनराजे निवडणुकीच्या प्रचारात फारसे सक्रिय दिसले नाहीत

शिवेंद्रराजे म्हणतात उदयनराजे नाराज नाहीत; उदयनराजे म्हणाले, ‘माझा एकच नाराजीचा मुद्दा होता’
सातारा : सातारा नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात खासदार उदयनराजे भोसले यांच्या अनुपस्थितीमुळे शहरात पसरलेल्या नाराजीच्या चर्चांना अखेर त्यांनी स्वतःच आपल्या खास शैलीत पूर्णविराम दिला आहे. ‘मी एकाच बाबतीत नाराज होतो, ते म्हणजे मलाही नगरपालिकेचा फॉर्म भरायचा होता, तो राहिला’ अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
मंगळवारी (दि. २) सकाळी अनंत इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रावर उदयनराजे भोसले यांनी पत्नी दमयंतीराजे भोसले यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सातारा पालिकेची निवडणूक आजवर विविध आघाड्यांच्या माध्यमातून लढविली जात असे. मात्र, यंदा प्रथमच ही निवडणूक भाजपच्या कमळ या पक्षचिन्हावर लढवली जात आहे. या बदलामुळे निवडणुकीत काही अडचणी येतील का, या प्रश्नावर त्यांनी ‘काही अडचण येईल, असे वाटत नसल्याचे स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे निवडणुकीच्या प्रचारात फारसे सक्रिय दिसले नाहीत, त्यामुळे ते पक्षावर किंवा निवडणुकीच्या भूमिकेवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या प्रश्नावर त्यांनी ‘मी एकाच बाबतीत नाराज होतो. ते म्हणजे मलाही फॉर्म भरायचा होता. तो राहिला,’ असे त उत्तर दिले. निवडणुकीसाठी इच्छा व्यक्त करणे अगदी स्वाभाविक आहे. मात्र, ज्यांनी खऱ्या अर्थाने विकासकामे केली आहेत, अशाच लोकांच्या पाठीशी सातारकर ठामपणे उभे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उदयनराजे नाराज नाहीत...
खासदार उदयनराजे भोसले यांच्या कथित नाराजीच्या चर्चांनाही त्यांनी पूर्णविराम दिला. आम्ही गट-तट न मानता सर्व उमेदवारांचा प्रचार केला आहे. उदयनराजेंनीदेखील भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात कोणतेही वक्तव्य केलेले नाही किंवा पक्षाच्या विरोधात ते काही बोलले नाहीत. अपक्ष उमेदवार केवळ तर्क-वितर्क करून मते मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, पण तसे काही होणार नाही. जिल्ह्यातील पाच ते सहा नगरपालिकांमध्ये भाजप यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.