99th Marathi Sahitya Sammelan: शिवाजी महाराज यांनी सुरत लुटल्याने समृद्धी - रघुवीर चौधरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 16:49 IST2026-01-05T16:36:42+5:302026-01-05T16:49:07+5:30
बालशिवाजीसाठी चक्क गुजराती भाषेतून पाळणा

99th Marathi Sahitya Sammelan: शिवाजी महाराज यांनी सुरत लुटल्याने समृद्धी - रघुवीर चौधरी
हणमंत पाटील
थोरले शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : गुजरातमधील सौराष्ट्राचाही शिवाजी महाराजांशी संबंध आहे. सौराष्ट्रातील एक कवी जव्हेरचंद मेघाणी यांनी बालशिवाजीसाठी चक्क गुजराती भाषेत पाळणा रचला आहे. बालशिवाजीला झोप यावी म्हणून अंगाईगीत गाणाऱ्या जिजाऊ मातोश्रींच्या मुखी हा पाळणा आहे. या अंगाईगीतातून महाराष्ट्राचे सौराष्ट्राशी असलेले संबंध दिसून येतात. गुजरातमधील सुरत दोन वेळा लुटल्याने तिथे विकास व समृद्धी आली. शिवाजी महाराज यांच्याविषयी गुजराती भाषेत बरेच लेखन झाले आहे, असे कौतुकही ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित व ज्येष्ठ साहित्यिक रघुवीर चौधरी यांनी केले.
सातारा येथील ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील रविवारी झालेल्या समारोप कार्यक्रमाला रघुवीर चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्रात साहित्य संस्थांच्या पाठीशी राज्य शासन उभे आहे, ही मराठी भाषेसाठी उत्तम गोष्ट आहे. भाषेसाठी साहित्य संस्था, लेखक आणि शासन यांनी असे एकत्रित प्रयत्न करत आहेत, हे चित्र दिलासादायक आहे. भाषेसाठी हे अनुकूल वातावरण आहे. भूमी सुपीक असल्याचे हे लक्षण आहे, अशा अनुकूल वातावरणात भाषेचा विकास होत राहो, अशा शुभेच्छा चौधरी यांनी दिल्या.
वाचा : अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ देण्यात यावा
अवघे ७ मिनिटांचे भाषण...
संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून रघुवीर चौधरी हे सविस्तर मांडणी करतील, अशी रसिकांना अपेक्षा होती. मात्र, चौधरी यांनी महाराष्ट्रातील नेते दीर्घ भाषणेही उत्तम करतात, अशी टिपणी करीत त्यांनी अवघे सात मिनिटांत भाषण उरकले.
वाचा: मराठी साहित्य संमेलनात भासली उदयनराजे भोसले यांची उणीव!, साहित्य रसिकांनी बोलून दाखवली खंत
महानायक कादंबरीचे कौतुक..
सानेगुरुजी आणि विनोबाजी यांनी तुरुंगवासात गीता प्रवचनांची निर्मिती केली. मीही तेव्हा त्यातून प्रेरणा घेत एक दीर्घ कविता लिहिली होती, अशी आठवण रघुवीर यांनी सांगितली. सातारा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या महानायक कादंबरीचे रघुवीर चौधरी यांनी विशेष कौतुक केले. मी या कादंबरीचा गुजराती अनुवाद वाचला आहे आणि प्रभावित झालो. विश्वास पाटील यांची भेट घेणे, हाही महाराष्ट्रात येण्याचा एक हेतू होता, असे त्यांनी सांगितले.