Satara Politics: भाजप, राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेचीही मोर्चेबांधणी, कराडला महाविकास आघाडीच्या गोटात शांतता

By प्रमोद सुकरे | Updated: June 3, 2025 13:04 IST2025-06-03T13:04:00+5:302025-06-03T13:04:49+5:30

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांची गोळा बेरीज सुरू

Shiv Sena leaders, following BJP and NCP, start preparations for upcoming elections in Karad taluka satara | Satara Politics: भाजप, राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेचीही मोर्चेबांधणी, कराडला महाविकास आघाडीच्या गोटात शांतता

Satara Politics: भाजप, राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेचीही मोर्चेबांधणी, कराडला महाविकास आघाडीच्या गोटात शांतता

प्रमोद सुकरे 

कऱ्हाड: विधानसभा जिंकली पण आता मिनी विधानसभा जिंकण्यासाठी राजकीय पक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. कऱ्हाड तालुक्यात तर भाजप, राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेच्या नेत्यांनी त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र विरोधी महाविकास आघाडीच्या गोटात मात्र शांतता दिसत आहे.

कऱ्हाड तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र गत विधानसभा निवडणुकीत डॉ. अतुल भोसले यांनी येथे परिवर्तनाचे 'कमळ' फुलवले आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात निश्चितच चांगले वातावरण आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांची गोळा बेरीज सुरू आहे. म्हणून तर काँग्रेसच्या गोटातील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांना भाजपने गळ टाकला असून अनेक जण या गळालाही लागले आहेत. त्यांचे पक्षप्रवेश गेल्या दोन महिन्यात वेळोवेळी झाले आहेत.

तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने एकच मोठा डाव मारला . काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अँड.उदयसिंह पाटील यांनाच पक्षप्रवेश देत तालुक्यातील राजकारणात मोठा भूकंप घडवला.

एकनाथ शिंदे शिवसेना गटाने देखील कराड शहर व तालुक्याला मोठा विकास निधी दिला असून त्यांचे शिलेदारही कामाला लागले आहेत. नुकताच पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थित कराडला एक मेळावा झाला. त्या मेळाव्यातही अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

सत्तेत असणाऱ्या महायुतीतील तिन्ही पक्ष आपली पक्ष संघटना वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. या उलट महाविकास आघाडीतील घटक पक्ष मात्र शांत दिसत आहेत.

पृथ्वीराज चव्हाण म्हणतात ..

भाजपने ईडी, सीबीआय ची भीती दाखवून काँग्रेसच्या नेत्यांना गळाला लावले. भाजप वाढवण्यासाठी त्यांना काँग्रेसचीच मदत घ्यावी लागते आहे. त्यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच क्लीन चीट देत पक्षात घेतले आहे. काँग्रेसमुक्त भारत करता करता त्यांची भाजप काँग्रेस युक्त झाली आहे. पण अशाने काँग्रेस कधीही संपणार नाही. असा हल्लाबोल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकत्याच झालेल्या एका काँग्रेसच्या मेळाव्यात केला.

अतुल भोसले म्हणतात..

त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या पक्षात थांबायला तयार नाहीत. काँग्रेसमध्ये आपल्याला भविष्य नाही हे त्यांना पटू लागल्यामुळेच ते भाजपमध्ये दाखल होत आहेत. मात्र ३९ हजार मतांनी झालेला पराभव आणि त्यानंतर काँग्रेस पक्षात सुरू असणारी गळती यामुळे अस्वस्थ होऊन पृथ्वीराज चव्हाण वक्तव्य करीत आहेत. तुम्ही जेव्हा ईव्हीएम मशीनद्वारे निवडून आला तेव्हा ते बरोबर होते आणि पराभव झाल्यावर मात्र तुम्ही कोर्टात जाता ही गोष्ट न पटणारी आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी आता पराभव पचवायची सवय करावी.अशी उपरोधिक टीका भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना  केली आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अँड. उदयसिंह पाटील यांचा पक्षप्रवेश करीत धमाका केला. पण उदयसिंह पाटलांच्या घड्याळाला अजून पूर्ण चावी मिळाल्याचे दिसत नाही‌. कारण एड. उदयसिंह पाटील यांनी पक्षप्रवेशानंतर ज्या पद्धतीने मतदार संघात काम करणे त्यांच्याच कार्यकर्त्यांना अपेक्षित होते तसे काम होत नसल्याची खंत त्यांचेच कार्यकर्ते खासगीत व्यक्त करीत आहेत.

Web Title: Shiv Sena leaders, following BJP and NCP, start preparations for upcoming elections in Karad taluka satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.