नवीन पालखी महामार्ग ‘अपघाताला निमंत्रण’; कोरेगाव रेल्वे ब्रिज परिसर बनला ‘ब्लॅक स्पॉट’, उद्घाटनाआधीच सातजणांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 19:26 IST2026-03-27T19:26:32+5:302026-03-27T19:26:53+5:30

स्थानिकांकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी

Seven people died on the new Alandi Pandharpur Palkhi highway before its inauguration | नवीन पालखी महामार्ग ‘अपघाताला निमंत्रण’; कोरेगाव रेल्वे ब्रिज परिसर बनला ‘ब्लॅक स्पॉट’, उद्घाटनाआधीच सातजणांचा बळी

संग्रहित छाया

राहिद सय्यद

लोणंद : आळंदी-पंढरपूर या नवीन पालखी महामार्गावर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. विशेषतः कोरेगाव रेल्वे ब्रिज परिसर हा अपघातप्रवण ‘ब्लॅक स्पॉट’ बनला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या रस्त्याचे अद्याप अधिकृत उद्घाटनही झाले नसताना येथे झालेल्या विविध अपघातांमध्ये आतापर्यंत सातजणांचा मृत्यू झाला आहे.

मागील काही महिन्यांत या ठिकाणी किरकोळ तसेच गंभीर अपघातांची मालिका सुरूच आहे. रस्त्याची रचना, वळणांची अयोग्य आखणी, पुरेशा चेतावणी फलकांचा अभाव आणि वेगनियंत्रणाची कोणतीही प्रभावी व्यवस्था नसल्याने हा मार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. रात्रीच्या वेळी प्रकाशयोजनेची कमतरता आणि स्पष्ट मार्गदर्शक चिन्हांचा अभाव यांमुळे अपघातांचा धोका अधिक वाढतो, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

‘नवीन पालखी महामार्ग झाला; पण सुरक्षितता कुठे? हा रस्ता अपघातांना सरळ निमंत्रण देत आहे,’ अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. या ठिकाणी वेगमर्यादा कडकपणे लागू करणे, ठळक चेतावणी फलक उभारणे, रस्त्यावरील सुरक्षा उपाययोजना वाढवणे तसेच पोलिसांची नियमित गस्त ठेवणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे. उद्घाटनाआधीच जीवितहानीची मालिका सुरू झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अपघातांची मालिका थांबवण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अन्यथा आणखी बळी जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

महामार्गावर पोलिस गस्त वाढवावी

धोकादायक वळणांची रचना, वेगमर्यादेचा अभाव, कंटेनर व ट्रकचालकांचा बेजबाबदार वेग आणि अपुरे वाहतूक नियंत्रण यांमुळे सर्वसामान्य वाहनचालकांचा जीव धोक्यात येत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. यावर उपाय म्हणून सदोष ठिकाणांचे तांत्रिक सर्वेक्षण करावे, वेगमर्यादा कडकपणे लागू करावी, चेतावणी फलक तातडीने उभारावेत आणि महामार्गावर पोलिस गस्त वाढवावी, अशी नागरिकांची ठोस मागणी आहे. लवकरच सार्वजनिक बांधकाम विभाग व एन. एच. आय. महामार्ग प्राधिकरण यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नवीन पालखी महामार्गावरील स्पीडब्रेकरसह आवश्यक सुरक्षा उपाययोजनांबाबत चर्चा केली जाणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांनी दिली आहे.

स्थानिकांकडून रस्ता क्रॉस करण्यासाठी थेट डिव्हाइडर तोडफोड

नवीन पालखी महामार्ग तयार करताना अनेक ठिकाणी रस्त्यालगतच्या हाॅटेलचालकांकडील तसेच छोट्या-छोट्या वाड्या-वस्त्यांना जोडणारे रस्ते महामार्गाला मिळतात, अशा ठिकाणी उड्डाणपूल किंवा पर्यायी भुयारी मार्ग नसल्याने स्थानिकांकडून रस्ता क्रॉस करण्यासाठी थेट डिव्हाइडर फोडण्यात आलेले आहेत, अशी वाहने अचानक समोर आल्यानंतर वेगाने जाणाऱ्या गाड्यांचे मोठे अपघात होण्याची दाट शक्यता वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे. काही आठवड्यांपूर्वी लोणंद-फलटण रस्त्यावरील एका हॉटेलसमोर अशाच डिव्हाइडर फोडलेल्या ठिकाणी अपघातात एका दुचाकीस्वाराला प्राण गमवावा लागला.

Web Title : नई पालखी राजमार्ग: दुर्घटना का निमंत्रण; कोरेगांव पुल बना ब्लैक स्पॉट

Web Summary : आलंदी-पंढरपुर राजमार्ग दुर्घटनाओं का केंद्र बन रहा है, खासकर कोरेगांव पुल के पास। खराब डिजाइन और अपर्याप्त सुरक्षा के कारण आधिकारिक उद्घाटन से पहले ही सात मौतें हो चुकी हैं। निवासियों ने गति सीमा और पुलिस गश्त बढ़ाने सहित तत्काल कार्रवाई की मांग की है ताकि और मौतों को रोका जा सके।

Web Title : New Palkhi Highway: Accident Invitation; Koregaon Bridge a Black Spot

Web Summary : The Alandi-Pandharpur highway is becoming an accident hotspot, especially near Koregaon bridge. Seven deaths have occurred before its official opening due to flawed design and inadequate safety measures. Locals demand immediate action, including speed limits and increased police patrols, to prevent further fatalities and address divider breaches.