राष्ट्रीय महामार्गावर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, आराखडा तयार करण्याच्या मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 15:38 IST2024-12-28T15:38:16+5:302024-12-28T15:38:41+5:30

कामाच्या दर्जाबाबत तडजोड नको..

Separate toilets for women on national highways Minister Shivendrasinhraje Bhosale's instructions to prepare the plan | राष्ट्रीय महामार्गावर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, आराखडा तयार करण्याच्या मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सूचना

राष्ट्रीय महामार्गावर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, आराखडा तयार करण्याच्या मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सूचना

सातारा : राज्यात समाविष्ट असलेल्या सर्व राष्ट्रीय महामार्गावरमहिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. स्वच्छतागृह बांधल्यानंतर त्याची स्वच्छता व देखभाल झाली पाहिजे, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने आराखडा तयार करावा, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केल्या.

साताऱ्यातील शासकीय विश्रामगृह येथे मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, पश्चिम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल अहिरे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील सर्व उपअभियंता, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध रस्ते, सर्व प्रकारचे पूल बांधणे, पथदिवे बसवणे, हॅम, नाबार्ड व इतर योजनांमधून सुरू असलेल्या कामांचा मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी आढावा घेतला. बामणोली ते दरे व तापोळा ते अहिर केबल स्टे पूल, आपटी ते तापोळा मोठा पूल बांधणे, सातारा-कोरेगाव रस्त्यावरील माहुली येथील नवीन पूल बांधणे, जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान बांधणे, सैनिक स्कूल नूतनीकरण, पाटण शासकीय इमारत, वाई शासकीय इमारत बांधकाम आदी सर्व कामांच्या प्रगतीबाबत चर्चा झाली.

प्रस्तावित कामे मंजूर करून घ्या, मंजूर असलेली कामे सुरू करून ती वेळेत पूर्ण करा, अशा सूचना शिवेंद्रसिंहराजे यांनी केल्या. मेडिकल कॉलेजचे काम प्रगतिपथावर असून येत्या काही महिन्यांत संपूर्ण काम पूर्ण होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

कामाच्या दर्जाबाबत तडजोड नको..

काम घेणारा ठेकेदार कोण आहे हे पाहू नका. ज्याने कोणी काम घेतले असेल त्याच्याकडून संबंधित काम दर्जेदार झालेच पाहिजे, यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घाला. कामाच्या दर्जाबाबत तडजोड होऊ देऊ नका, अशा सूचनाही या बैठकीत मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

Web Title: Separate toilets for women on national highways Minister Shivendrasinhraje Bhosale's instructions to prepare the plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.