Satara Tourism: स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड आणि बरंच काही; मुनावळे येथे देशातील गोड्या पाण्यातील पहिले पर्यटन केंद्र सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 17:24 IST2025-10-15T17:16:28+5:302025-10-15T17:24:27+5:30
जलपर्यटनास प्रारंभ

Satara Tourism: स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड आणि बरंच काही; मुनावळे येथे देशातील गोड्या पाण्यातील पहिले पर्यटन केंद्र सुरू
सातारा : देशातील गोड्या पाण्यातील पहिल्या व जागतिक दर्जाच्या मुनावळे (ता. जावली) येथील जलपर्यटनास नुकताच प्रारंभ झाला आहे. कोयना धरणावरील हे जलपर्यटन केंद्र सुरू झाल्यामुळे राज्यभरातील पर्यटकांना आता साहसी खेळांचा आनंद लुटता येणार आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून कोयनेच्या शिवसागर जलाशयावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलपर्यटन विकसित करण्यात आले. कोयना धरण व शिवसागर जलाशय परिसर समृद्ध जैवविविधतेचे आगर आहे. मुनावळे येथे पर्यटकांना आता स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड, जेट स्की, पॅरासेलिंग, बम्पर राईड, लेक क्रूझिंग बोट, फ्लाईंग फिश, कयाकिंग आदींचा थरार अनुभवता येणार आहे.
या जलपर्यटन केंद्राच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्था वृद्धिंगत होत असून स्थानिकांना शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. राज्यातील महत्त्वाची जलपर्यटनस्थळे २५ मे ते ३१ सप्टेंबर या कालावधीत बंद ठेवण्यात आली होती. नैसर्गिक आपत्ती व स्थानिक परिस्थितीचा विचार करून सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र जलपर्यटन सुरू झाल्याने पर्यटकांची पावले मुनावळेकडे वळू लागली आहेत.
पर्यावरणपूरक बोटींचा वापर..
मुनावळे येथे अत्याधुनिक व सर्व सोयींनीयुक्त असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ विकसित करण्यात येत आहे. या ठिकाणी पर्यावरणाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि जलपर्यटन क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे पर्यावरणपूरक बोटींचा वापरही करण्यात येत आहे.
साहसी पर्यटकांना मुनावळेचे जलपर्यटन नेहमीच खुणावत असते. येथील आंतरराष्ट्रीय जलपर्यटन केंद्रावर साहसी जेट स्की राईड, पॅरासेलिंगसह लेक क्रुझिंग बोट सेवेला पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. - गोविंद खवणेकर, सहायक व्यवस्थापक, कोयना जलपर्यटन केंद्र, मुनावळे