Satara: शाळकरी मुलीवर शेतात अत्याचार; पाटण तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 12:08 IST2025-01-13T12:08:13+5:302025-01-13T12:08:27+5:30
कोणाला सांगितलेस तर आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी

Satara: शाळकरी मुलीवर शेतात अत्याचार; पाटण तालुक्यातील घटना
सातारा : सहावीत शिकणाऱ्या बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना पाटण तालुक्यात शुक्रवार, दि.१० रोजी सायंकाळी सव्वापाच वाजता घडली. याप्रकरणी पाटण पोलिस ठाण्यात एका तरुणावर अत्याचारासह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत प्रकाश मोहिते (वय २५, रा. मोरगिरी, ता. पाटण, जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी बारा वर्षांची असून, पीडित मुलगी आणि संशयित आरोपी वेगवेगळ्या गावात वास्तव्य करतात. शुक्रवार, दि. १० रोजी सायंकाळी पाच वाजता संशयित प्रशांत मोहिते हा पीडित मुलीला त्याच्या दुचाकीवर बसवून रस्त्याने निघाला. वाटेत त्याने दुचाकी थांबवली. त्यानंतर तिला शेतामध्ये नेले. त्या ठिकाणी त्याने तिच्यावर अत्याचार केला.
हा झालेला प्रकार कोणाला सांगू नये म्हणून त्याने पीडित मुलीच्या आई -वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली. मात्र, संबंधित मुलीने हा प्रकार तिच्या घरातल्यांना सांगितला. त्यानंतर तिच्या आईने दि. ११ रोजी सकाळी पावणेसात वाजता पाटण पोलिस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक कवठेकर हे पुढील तपास करीत आहेत.
पोलिस अधीक्षकांची घटनास्थळी धाव
पाटण तालुक्यात एका शाळकरी मुलीवर अत्याचार झाल्याचे समजताच पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, पाटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी विजय पाटील आदी अधिकाऱ्यांनी तातडीने पाटण येथे धाव घेऊन माहिती घेतली. तसेच अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या.