Satara: मार्डीत शेततळ्यात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू, पालकांकडून संशय व्यक्त; घटनेचा तपास करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 13:39 IST2025-04-17T13:39:09+5:302025-04-17T13:39:28+5:30
पळशी : मार्डी, ता. माण येथील ९ वर्षांच्या शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी तीनच्या ...

Satara: मार्डीत शेततळ्यात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू, पालकांकडून संशय व्यक्त; घटनेचा तपास करण्याची मागणी
पळशी : मार्डी, ता. माण येथील ९ वर्षांच्या शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास जोतिबा परिसरात उघडकीस आली. या घटनेनंतर मृत मुलाच्या पालकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून, या घटनेचा सखोल तपास करावा, अशी मागणी दहिवडी पोलिसांकडे केली आहे. शंभूराज शशिकांत राजमाने (रा. मार्डी) असे शेततळ्यात बुडून मृत्यृ झालेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, मार्डी येथील शंभूराज राजमाने हा तबला व पेटी वाजवण्याच्या खासगी क्लासला नेहमीप्रमाणे मंगळवार, दि. १५ रोजी दुपारी सायकल घेऊन गेला होता. तो रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. त्यामुळे पालकांनी क्लासमध्ये व क्लासच्या इतर मुलांकडे चौकशी केली असता तो क्लासला आला नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे घाबरलेल्या पालकांनी नातेवाइकांच्या मदतीने त्याची इतरत्र शोधाशोध सुरू केला.
रात्री उशिरा क्लासशेजारील नलवडे यांच्या घरामागे असणाऱ्या शेततळ्याशेजारीच त्याची सायकल व चप्पल पडल्याचे नातेवाइकांना दिसून आले. नातेवाइकांनी शोध घेतला असता शेततळ्यात शंभूराजचा मृतदेह आढळला. या घटनेची नोंद दहिवडी पोलिसांत झाली आहे.
‘तो’ कोणाला दिसला कसा नाही..
तबल्याच्या क्लासला मोजकीच मुले जात असतात. त्यात शंभूराज हा सायकल घेऊन आला असताना क्लास घेणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना तो कसा दिसला नाही. या बाबतीत मात्र मार्डी ग्रामस्थ शंका उपस्थित करत आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी मृत मुलाचे पालक शशिकांत राजमाने यांनी दहिवडी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.
आई-वडिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश..
शंभूराज हा अत्यंत हुशार आणि मनमिळावू असल्यामुळे तो आई- वडील, नातेवाईक व गावकऱ्यांचा अत्यंत लाडका होता. त्याच्या जाण्याने गावकरी व आई- वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आई-वडिलांचा आक्रोश पाहताना उपस्थितांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत.