साताऱ्याचा शाही दसरा यंदा साधेपणाने होणार, उदयनराजेंनी पूरग्रस्तांसाठी मदतीचे केले आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 16:48 IST2025-09-29T16:47:14+5:302025-09-29T16:48:12+5:30
सातारा : महाराष्ट्रातील अनेक गावे आज भीषण पूरतांडवाच्या विळख्यात असताना, खासदार उदयनराजे भोसले यांनी राजघराण्याच्या संवेदनशीलतेचा वारसा प्रखरतेने जपला ...

साताऱ्याचा शाही दसरा यंदा साधेपणाने होणार, उदयनराजेंनी पूरग्रस्तांसाठी मदतीचे केले आवाहन
सातारा : महाराष्ट्रातील अनेक गावे आज भीषण पूरतांडवाच्या विळख्यात असताना, खासदार उदयनराजे भोसले यांनी राजघराण्याच्या संवेदनशीलतेचा वारसा प्रखरतेने जपला आहे. दि. २ ऑक्टोबर रोजी साताऱ्यात होणारा ऐतिहासिक शाही दसरा आणि सीमोल्लंघन सोहळा, डामडौल, राजेशाही थाट बाजूला ठेवून अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून पूरग्रस्तांसाठी मदतीचे भावनिक आवाहनही केले आहे.
याबाबत प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात उदयनराजे यांनी नमूद केले आहे की, मराठवाडा, कोकण आणि साताऱ्याच्या पूर्वभागात वरुणराजाने कहर केला आहे. या पावसात जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली असून, बळीराजा पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. पशुधनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकंदरीत जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत साताऱ्याचा शाही विजयादशमी आणि सिमोल्लंघन सोहळा थाटामाटात, धूमधडाक्यात, डामडौलात करणे हे आमच्या मनाला पटणारे नाही.
पावसामुळे मराठवाड्यासह नुकसान झालेल्या गावांना मोठ्या मदतीची गरज आहे. त्यामुळे शाही दसरा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक नागरिकाने एक भारतीय म्हणून पूरबाधितांच्या मदत कार्यासाठी शक्य होईल तितकी आर्थिक किंवा वस्तु किंवा धान्य स्वरुपातील मदत, जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील मुख्यमंत्री पूरग्रस्त सहाय्यता निधीमध्ये जमा करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.