Satara ZP Election Results 2026: फलटणच्या मैदानात रामराजे गटाचे कमबॅक, भाजपच्या अपयशाची कारणे काय..वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 18:01 IST2026-02-10T18:00:37+5:302026-02-10T18:01:10+5:30
विकास शिंदे फलटण : फलटणच्या मतदारांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राजकीय समतोल राखत भाजप व शिंदेसेना यांना ...

Satara ZP Election Results 2026: फलटणच्या मैदानात रामराजे गटाचे कमबॅक, भाजपच्या अपयशाची कारणे काय..वाचा सविस्तर
विकास शिंदे
फलटण : फलटणच्या मतदारांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राजकीय समतोल राखत भाजप व शिंदेसेना यांना समान जागा निवडून देत एक चिंतन करायला लावणारा निकाल दिला. यापूर्वी झालेल्या विधानसभा व पालिका निवडणुकीत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना सत्ता देत जनतेने रामराजे गटाची तीस वर्षांची सत्ता उलथवून लावली. जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये विजयाची ही मालिका कायम ठेवण्यात मात्र रणजितसिंह यांना अपयश आले. शिंदेसेनेने फलटण तालुक्यात जोरदार मुसंडी मारत जिल्हा परिषदेच्या ५ जागा व पंचायत समितीच्या तब्बल ८ जागा जिंकून धक्कादायक निकाल दिला.
रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपला सगळा राजकीय अनुभव पणाला लावून उमेदवारी देताना जातीय समीकरणे राखली त्याचा फायदा त्यांना झाल्याचे दिसून आले. या उलट रणजितसिंह यांच्या कार्यकर्त्यांनी हट्टाने घेतलेली तिकिटे व त्यांना निवडूण आणता-आणता नेतृत्वाचा कस लागला.
कोळकी येथील रणजितसिंह यांचे निष्ठावान भाजपचे जयकुमार शिंदे यांचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात दिवंगत चिमणराव कदम यांचे चिरंजीव सह्याद्री कदम यांनी एकहाती विजय मिळवत पराभव केला. यामुळे स्व. चिमणराव कदम गटाचे पुन्हा पुनरुज्जीवन झाले असून गट आणखी प्रबळ होण्यास मदत होणार आहे.
तरडगाव जिल्हा परिषदेतील गिरीश बनकर या तरुण उमेदवाराने सगळी जातीय समीकरणे उद्ध्वस्त करत दणदणीत विजय मिळवला. यावेळी जिल्हा परिषदेत एक तरुण उमदा चेहरा देण्यात तरडगावला यश आले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे यांचा बालेकिल्ला राखण्यात गिरीश बनकर यांना यश आले.
फलटण जिल्हा परिषदेत पक्षीय बलाबल
- भाजप : २
- राष्ट्रवादी : १
- शिंदेसेना : ५
पंचायत समिती पक्षीय बलाबल
- भाजप : ५
- राष्ट्रवादी : ८
- शिंदेसेना : ८
भाजपच्या अपयशाची कारणे
- मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश घेतल्याने निष्ठावंतांना राजकीय धोका निर्माण झाला
- उमेदवारी देताना जातीय समीकरणे राखता आली नाहीत
- प्रभारी व उमेदवार यांच्यात प्रचंड गोंधळ होता
- उमेदवारांनी पॅनलसाठी मतदान करून घेतले नाही
- राजेगटाने योग्य व अचूक उमेदवार दिले त्यांचा गावपातळीवर लोकसंपर्क चांगला होता.