Satara ZP Election 2026: सत्तेचा खेळ; राष्ट्रवादी-शिंदेसेनेच्या दबावात भाजपची रणनीती!

By नितीन काळेल | Updated: February 12, 2026 19:23 IST2026-02-12T19:22:24+5:302026-02-12T19:23:42+5:30

महायुतीचीच सत्ता येणार; सोबत कोणाची हाच कळीचा प्रश्न

Satara ZP Election 2026 Power game, BJP's strategy under pressure from NCP-Shinde Sena | Satara ZP Election 2026: सत्तेचा खेळ; राष्ट्रवादी-शिंदेसेनेच्या दबावात भाजपची रणनीती!

Satara ZP Election 2026: सत्तेचा खेळ; राष्ट्रवादी-शिंदेसेनेच्या दबावात भाजपची रणनीती!

नितीन काळेल

सातारा : सातारा जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने महायुती अंतर्गत पक्षांना एकत्र येऊनच सत्ता मिळवावी लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिंदेसेनेतून पावले पडू लागल्याने भाजपवर दबाव वाढला आहे. त्यातच निवडणुकीपूर्वी महायुतीसाठी प्रयत्न करणारे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही सावध भूमिका घेतल्याने भाजपला नवी रणनीती आखून सत्तेचं गणित मांडावं लागणार आहे. तसेच जिल्हा परिषदेत महायुतीचीच सत्ता येणार असलीतरी सोबत कोण असणार हाच कळीचा प्रश्न असणार आहे.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. ६५ पैकी २७ जागा जिंकून भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला. तर दुसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) पक्षाने २० जागा जिंकल्या. तसेच शिंदेसेनेने १५ जागा जिंकून तिसरे स्थान पटकावले. जिल्हा परिषदेची सत्ता मिळविण्यासाठी महायुतीतील किमान दोन पक्षांना एकत्र यावेच लागणार आहे. तरच बहुमताचा आकडा पार पडणार आहे.

भाजप निवडणुकीत मोठा भाऊ ठरला असलातरी त्यांच्याशी हातमिळवणी करण्यासाठी सध्यातरी राष्ट्रवादी किंवा शिंदेसेना राजी नाही. उलट या दोन पक्षांच्या नेत्यांची एक गोपनीय बैठकही पार पडली. त्यामध्ये सत्तास्थापनेसाठी राजकीय खलबते झाली. एकत्र येऊन सत्ता घेणे इथपर्यंत राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेची चर्चा गेल्याची माहिती मिळत आहे. यामुळे भाजपपुढे सत्तेचं गणित जुळवणं अवघड झालेलं आहे.

निवडणुकीत भाजपच्या नेत्यांकडून राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न झाला होता. त्यांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेतल्या होत्या. याची सल दोन्ही पक्षातील नेत्यांना आहे. त्यातच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीसाठी प्रयत्न केला होता. पण, भाजपकडून प्रतिसाद मिळाला नाही, हे पालकमंत्री देसाई यांनी वारंवार बोलून दाखवले आहे. त्यामुळे आता ते भाजपबरोबर सत्ता स्थापनेसाठी बोलणी करणार नाहीत हे त्यांच्या बोलण्यातून समोर येत आहे. त्यामुळे भाजपलाच पुढाकार घ्यावा लागेल.

यासाठी एकाचवेळी भाजपला दोन्ही पातळीवर खिंड लढवावी लागेल. यातूनच भाजप एकीकडे राष्ट्रवादीबरोबर बोलू शकते. तर दुसरीकडे शिंदेसेनेकडे मदतीचा हात मागू शकते, अशीही चर्चा सुरू झाली आहे. कारण, सत्तेच्या काठावर असलेल्या भाजपला काहीही करून जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवयाचाच आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेने सत्तेसाठी पावले उचलली असलीतरी भाजपची रणनीती आणि गणितं ऐनवेळी बऱ्याच घडामोडी करू शकतात. यावरून येणारे काही दिवस हे राजकीय घडामोडीचेच ठरणार आहेत.

भाजपला पुढाकार घ्यावा लागेल...

जिल्ह्यातील पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महायुतीसाठी पुढाकार घेतला. पण, भाजपकडून प्रतिसादच मिळाला नाही. दोनवेळा प्रयत्न करूनही यश आले नाही. त्यामुळे पालकमंत्री तिसऱ्यांदा भाजपबरोबर युतीसाठी बोलतील असेतरी सध्या वाटत नाही. त्यामुळे कोंडीत असलेल्या भाजपलाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.

भाजप अन् शिंदेसेनेचे वरिष्ठ निर्णय घेणार...

राज्यात भाजप आणि शिंदेसेनेचे राजकीय कनेक्शन एकदम ओक्के आहे. त्यातच अनेक ठिकाणी दोघांनी एकत्र येत सत्ता मिळवली. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेतही भाजप आणि शिंदेसेना एकत्र येऊ शकते. यासाठी दोन्ही पक्षांचे वरिष्ठच अंतिम निर्णय घेतील. त्यातून सत्ता वाटपाचा फाॅर्म्युला तयार होईल. पण, या घडामोडीत राष्ट्रवादीही काही तडजोडी करून सत्तेत कसे सहभागी होता येईल हेही अंदाज बांधू शकते. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी महायुतीतील दोन पक्ष एकत्र येणार की तिघेजण सत्ता स्थापन करणार हे लवकरच समोर येणार आहे.

शिंदेसेनेच्या नेत्यांशी भेट झाली. जिल्हा नियाेजन समिती कामांबाबत तसेच इतर काही प्राथमिक चर्चा झाली. आम्हाला आणि त्यांनाही वरिष्ठ नेत्यांचा विचारावे लागेल. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीबाबत अजून नोटिफिकेशन नाही. अजून याला सावकाश आहे. घाई करून काय करायचं. बघुया पुढे काय होतंय ते.

Web Title : सतारा ZP चुनाव 2026: सत्ता का खेल; एनसीपी-शिंदे सेना के दबाव में भाजपा!

Web Summary : सतारा ZP में सत्ता के लिए संघर्ष जारी है क्योंकि किसी भी दल को बहुमत नहीं मिला है। एनसीपी और शिंदे सेना के कदमों से भाजपा पर दबाव है, जिसके लिए सत्ता के लिए एक नई रणनीति की आवश्यकता है। सरकार बनाने के लिए गठबंधन महत्वपूर्ण हैं।

Web Title : Satara ZP Election 2026: Power play amid NCP-Shinde Sena pressure!

Web Summary : Satara ZP sees a power struggle as no party has a majority. NCP and Shinde Sena's moves put pressure on BJP, requiring a new strategy for power. Alliances are crucial for forming the government.