भाजपाची जोरदार मुसंडी, मात्र मंत्री जयकुमार गोरे यांना जबर धक्का, कुटुंबातील दोन सदस्य पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 16:58 IST2026-02-09T16:58:09+5:302026-02-09T16:58:33+5:30
Satara Zilla Parishad Election Result 2025: आज जाहीर झालेल्या राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. तसेच अनेक बड्या नेत्यांच्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना पराभवाचा धक्का बसला आहे.

भाजपाची जोरदार मुसंडी, मात्र मंत्री जयकुमार गोरे यांना जबर धक्का, कुटुंबातील दोन सदस्य पराभूत
आज जाहीर झालेल्या राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. तसेच अनेक बड्या नेत्यांच्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्यामध्ये राज्य सरकारमधील मंत्री जयकुमार गोरे यांच्या नातेवाईकांचाही समावेश आहे. जयकुमार गोरे यांच्या वहिनी आणि चुलत भाऊ अशा गोरे कुटुंबातील दोन सदस्यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.
भाजपाचे नेते आणि राज्य सरकारमधील प्रभावशाली मंत्र्यांपैकी एक असलेल्या जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषद सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये पक्षासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मात्र आपल्या बालेकिल्ल्यामध्येच आपल्या नातेवाईकांना विजय मिळवून देण्यात जयकुमार गोरे यांना अपयश आलं आहे. सातारा जिल्ह्यतील औंध जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जयकुमार गोरे यांच्या वहिनी भारती गोरे या पराभूत झाल्या त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा फडतरे यांनी ४० मतांनी पराभूत केले.
तर जयकुमार गोरे यांचे चुलत भाऊ अरुण गोरे यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. कुकुडवाड जिल्हा परिषद गटामध्ये भाजपाकडून लढत असलेल्या अरुण गोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल देसाई यांनी अटीतटीच्या लढतीत पराभूत केलं आहे. मात्र जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे यांनी आंधळी जिल्हा परिषद गटामधून विजय मिळवला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिपाली जगदाळे यांना पराभूत केले.