साताऱ्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी पुन्हा रजेवर; सक्तीच्या रजेवर पाठविल्याचा पालकमंत्र्यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 15:42 IST2026-03-31T15:42:22+5:302026-03-31T15:42:41+5:30
वैशाली कडूकर यांच्याकडे पदभार

साताऱ्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी पुन्हा रजेवर; सक्तीच्या रजेवर पाठविल्याचा पालकमंत्र्यांचा दावा
सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेवेळी झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. त्याचवेळी ६ एप्रिलपर्यंत त्यांची अर्जित रजा मंजूर करण्यात आली आहे. त्याचा पदभार अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्याकडे देण्यात आला आहे.
गेल्या आठ दिवसांत ते दुसऱ्यांदा रजेवर गेल्याने राजकीय व प्रशासकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तुषार दोशी हे सक्तीच्या रजेवर गेल्याचा दावा केला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळी झालेल्या राड्याचे पडसाद विधिमंडळात उमटले होते. त्यानंतर काही काळासाठी दोशी यांच्या निलंबनाचे निर्देशही विधानसभा उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले होते. मात्र, काही तासांतच त्या आदेशाला सभापतींनी स्थगिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन विधिमंडळात दिले होते.
‘त्यांना’ आनंद घेऊ द्या : जयकुमार गोरे
पोलिस अधीक्षक तुषार दोशी हे सक्तीच्या रजेवर गेले, असे ज्यांना वाटते त्यांना त्याचा आनंद घेऊ द्या, असा टोला ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी पालकमंत्री शंभुराज देसाई यांचे नाव न घेता मारला. तसेच, ज्यांना ते अर्जित रजेवर गेले असे वाटते, त्यांना तसे वाटू द्या, अशी प्रतिक्रिया गोरे यांनी दिली.
अपहरण नाट्याची चौकशी सुरू...
जिल्हा परिषदेत घडलेल्या ‘अपहरण नाट्या’ची सध्या चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील तपास अधिकारी पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना महाबळेश्वर न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. चौकशीच्या काळात संबंधित अधिकाऱ्यांनी पदावर राहू नये, असे प्रशासकीय संकेत आहेत. त्यामुळे दोशी यांची अर्जित रजा मंजूर झाल्याचे प्रशासनातील सूत्राने सांगितले.