सातारा :कठडा तोडून वाळूचा ट्रक नदीपात्रात, दहिवडीजवळ अपघात; गायब चालकाचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 14:10 IST2018-04-20T14:10:14+5:302018-04-20T14:10:14+5:30
वाळू वाहतूक करणारा ट्रक गुरुवारी मध्यरात्री दहिवडी शेजारील पुलावरून माणगंगा नदीपात्रात कोसळला. अपघातानंतर ट्रकचालक गायब झाला असून, मालकही अद्याप तेथे आला नाही. त्यामुळे दहिवडी पोलीसही चक्रावले आहेत.

सातारा :कठडा तोडून वाळूचा ट्रक नदीपात्रात, दहिवडीजवळ अपघात; गायब चालकाचा शोध सुरू
दहिवडी (सातारा) : वाळू वाहतूक करणारा ट्रक गुरुवारी मध्यरात्री दहिवडी शेजारील पुलावरून माणगंगा नदीपात्रात कोसळला. अपघातानंतर ट्रकचालक गायब झाला असून, मालकही अद्याप तेथे आला नाही. त्यामुळे दहिवडी पोलीसही चक्रावले आहेत.
याबाबत माहिती अशी की, फलटणकडून दहिवडीकडे येणारा वाळूचा ट्रक गुरुवारी मध्यरात्री उलटला. एमएच ४५-१६७१ असा गाडी नंबर असून, या गाडीचा चालक गायब आहे. या पुलावर सहा महिन्यांपूर्वी एसटी कोसळली होती. त्याच पुलावरून पुन्हा कठडे तोडून ट्रक पडला.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर दहिवडीचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातग्रस्त गाडी मालकाचा शोध सुरू असून, वाळू उपसा बंद असतानाही वाळू वाहतूक नेमकी कुठे चालली होती, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
ट्रक उलटल्याने चालक गंभीर जखमी झाला असल्याची शक्यता असून, तो कोणत्या रुग्णालयात उपचार घेत आहे, याचाही पोलीस शोध घेत आहेत. मात्र परिसरातील आणि शहरातील मोठ्या रुग्णालयात कोणीही आलेला नाही.
वारंवार अपघात घडत असल्याने पुलाची रुंदी वाढविण्याबाबत वाहनचालकांमधून वारंवार मागणी केली जात आहे. संबंधित विभाग मात्र तात्पुरती डागडुजी करून वेळ मारून नेत आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.