सातारा : नवीन मोबाईलसाठी मुलाने घेतले विष, जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 14:42 IST2018-04-28T14:42:48+5:302018-04-28T14:42:48+5:30
हल्लीची मुले छोट्या-छोट्या कारणावरूनही अगदी टोकाचे पाऊल उचलत असल्याचे दिसून येत आहे. खटाव तालुक्यातील नडवळ येथील एका पंधरा वर्षांच्या शाळकरी मुलाने नवीन मोबाईल घेत नाहीत म्हणून चक्क विषारी औषध पिऊन आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला.

सातारा : नवीन मोबाईलसाठी मुलाने घेतले विष, जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
सातारा : हल्लीची मुले छोट्या-छोट्या कारणावरूनही अगदी टोकाचे पाऊल उचलत असल्याचे दिसून येत आहे.
खटाव तालुक्यातील नडवळ येथील एका पंधरा वर्षांच्या शाळकरी मुलाने नवीन मोबाईल घेत नाहीत म्हणून चक्क विषारी औषध पिऊन आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. या घटनेने भेदरलेल्या नातेवाईकांनी त्याला तत्काळ साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
सुमित संजय कुकळे असे विषारी औषध प्राशन केलेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून सुमितने नवीन मोबाईल घेण्यासाठी घरातल्यांकडे हट्ट धरला होता.
शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे तो अंथरूनातून उठला. त्यानंतर अचानक त्याने साडेसात वाजता विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार त्याच्या घरातल्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याला तत्काळ नजिकच्या दवाखान्यात नेण्यात आले.
त्यानंतर तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले.
नवीन मोबाईल घेण्याच्या कारणावरून सुमितने विष प्राशन केले असल्याचा जबाब त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील पोलिसांना दिला आहे. मात्र, आमची कोणाबाबतही तक्रार नाही, असेही नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे.