सातारा : दरीत मृतावस्थेत सापडलेल्या युवकाचा खूनच, सैन्य दलातील जवानासह दोघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 14:35 IST2018-09-20T14:33:22+5:302018-09-20T14:35:33+5:30
कास रस्त्यावर अनावळे गावच्या हद्दीत डोंगराच्या कड्याखाली मृतावस्थेत सापडलेल्या युवकाचा खूनच झाल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.

सातारा : दरीत मृतावस्थेत सापडलेल्या युवकाचा खूनच, सैन्य दलातील जवानासह दोघांवर गुन्हा
सातारा : कास रस्त्यावर अनावळे गावच्या हद्दीत डोंगराच्या कड्याखाली मृतावस्थेत सापडलेल्या युवकाचा खूनच झाल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.
याप्रकरणी सैन्य दलातील एका जवानासह दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. सैन्य दलात कार्यरत असलेला जवान वैभव इंगवले (रा. विकासनगर), त्याचा मित्र सागर सुनील दळवी (रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यादोगोपाळ पेठेतील मनिष शिवाजी लाड (वय २८) याला दि. १४ रोजी दुपारी यादोगोपाळ पेठेतील राष्ट्रीय शाळा मैदानातून सैन्य दलातील जवान वैभव इंगवले व सागर दळवी याने दुचाकीवरुन नेले होते.
अनावळे, ता. सातारा गावच्या हद्दीतील डोंगराच्या कड्यावरून त्याला ढकलले. त्यावेळी दरीत पडल्याने मनिषचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर तीन दिवसांनी ही बाब लक्षात आली. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी सातारा तालुका पोलिसांनी मृतदेह दरीतून वर काढला.
शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर बुधवारी रात्री उशिरा सातारा तालुका पोलीस ठाण्यात सनी शिवाजी लाड यांनी फिर्याद दिली. त्यानंतर वैभव इंगवले आणि सागर दळवी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांनी नेमक्या कोणत्या कारणातून हा खून केला, हे अद्याप समोर आले नसून, पोलीस दोघांचाही शोध घेत आहेत.