साताऱ्यातील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात - रुपाली चाकणकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 11:42 IST2025-10-17T11:42:10+5:302025-10-17T11:42:51+5:30
महिला आयोगामार्फत फाशीच्या शिक्षेची शिफारस करणार

साताऱ्यातील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात - रुपाली चाकणकर
सातारा : सातारा तालुक्यात अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तिच्या कुटुंबाला न्याय लवकरात लवकर मिळावा, यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयात ही केस चालवली जाणार आहे. राज्य महिला आयोगामार्फत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी शिफारस करणार असल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी मृत मुलीच्या घरी जाऊन कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी यावेळी पोलिस अधीक्षक तुषार दोशी उपस्थित होते. पीडित मुलीच्या कुटुंबीयांना कोणत्याही प्रकाराचा त्रास होऊ नये, यासाठी पोलिस संरक्षण द्यावे, असे सांगून चाकणकर म्हणाल्या, ‘मनोधैर्य योजनेतून कुटुंबाला तातडीने मदत करावी तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतूनही कुटुंबाला मदत मिळवून देण्यात येईल. राज्य महिला आयोग आपल्या पाठीशी असून, न्यायालयात जास्तीत जास्त पुरावे सादर करून आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील.
पोक्सोमधील सर्व गुन्हेगारांवर लक्ष ठेवा
अशी घटना सातारा जिल्ह्यात पुन्हा घडू नये, यासाठी पोक्सोमधील जे गुन्हेगार बाहेर आहेत, ते सध्या काय करीत आहेत, याची तपासणी करून काही गैरवर्तन करीत असल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, असे निर्देश चाकणकर यांनी पोलिस विभागाला दिले.