निवडणुकीच्या रणधुमाळीत सातारा राज्याच्या केंद्रस्थानी!; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
By सचिन काकडे | Updated: October 17, 2025 17:50 IST2025-10-17T17:44:10+5:302025-10-17T17:50:45+5:30
शशिकांत शिंदे यांचीही मोर्चेबांधणी

निवडणुकीच्या रणधुमाळीत सातारा राज्याच्या केंद्रस्थानी!; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
सचिन काकडे
सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे आता वेगाने वाहू लागले असून, सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या रणधुमाळीत पुन्हा एकदा सातारा जिल्हा राज्याच्या ‘केंद्रस्थानी’ आला आहे. राज्याच्या सर्वोच्च पदावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जिल्ह्यातील चारही मंत्र्यांनी या निवडणुकांकडे लक्ष केंद्रित आहे. गेल्या काही दिवसांपासून सभा व बैठकांचा धुरळा उडत असून, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी जोरदार रणनीती आखली जात आहे.
मुख्यमंत्र्यांचा कानमंत्र...
काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट शब्दांत सूचना देत, ‘काही झाले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे कमळ फुललेच पाहिजे’, असा कानमंत्र दिला. त्यांच्या या निर्देशामुळे भाजपचे जिल्ह्यातील पदाधिकारी चार्ज झाले असून, अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. ज्या भागात भाजपची ताकद अधिक आहे, तिथे मैत्रीपूर्ण लढतीतून कमळ फुलवण्याची तयारी सुरू झाली आहे.
एकनाथ शिंदे यांचीही गर्जना...
मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकांचा धडाका सुरू केल्यानंतर, सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही आपला जिल्हा खुणावू लागला. बुधवारी त्यांनी थेट ठाण्यातून साताऱ्याला हजेरी लावली. जिल्हा परिषदेच्या सभागृहात त्यांनी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याचा उपदेश केला. ‘कार्यकर्त्यांसाठी कार्यकर्ता बनून काम करा,’ अशा सूचना त्यांनी लोकप्रतिनिधींना केल्या. ‘गाव तिथे शाखा’हा मंत्र दिला. आगामी काळात जिल्ह्यात सेनेची ताकद वाढवणार असल्याचे सांगत, शिवसेना या निवडणुकीत जोरकसपणे उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.
अजित पवार यांचीही चाल!
उपमुख्यमंत्री अजित पवार काही दिवसांपूर्वी औंध महोत्सवासाठी जिल्ह्यात येऊन गेले. जरी त्यांनी निवडणुकीसंदर्भात थेट बैठक घेतली नसली तरी, त्यांच्या पक्षाचे जिल्ह्यात दोन आमदार आहेत आणि अकरा तालुक्यांत राष्ट्रवादीला मानणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी फळी कार्यरत आहे. त्यांच्याकडूनही कार्यकर्त्यांना निवडणुकीबाबत ‘योग्य त्या’ सूचना दिल्या जात आहेत.
शशिकांत शिंदे यांचीही मोर्चेबांधणी
राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी गाठीभेटी आणि बैठकांचा धडाका पूर्वीच सुरू केला आहे. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यापासून ते कार्यकर्त्यांना एकत्र आणून त्यांना बळ देत आहेत. ‘लोकसभा’ आणि ‘विधानसभे’ची पुनरावृत्ती टाळून, जिल्ह्यात आपला पक्ष अधिक बळकट करण्यासाठी पूर्ण ताकदीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार असल्याचे संकेत त्यांनी यापूर्वीच दिले आहेत.
चार मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला...
सातारा जिल्ह्याला प्रथमच चार मंत्री लाभले आहेत. यामध्ये बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, पर्यटनमंत्री शंभूराज देसाई आणि ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील याच जिल्ह्याचे असल्याने, यंदाची निवडणूक प्रत्येक नेत्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे. या दिग्गज नेत्यांच्या सक्रियतेमुळे सातारा जिल्हा पुन्हा एकदा राज्याच्या केंद्रस्थानी आला आहे. आगामी काळात अनेक राजकीय घडामोडी घडणार असून, महायुतीला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी कोणती रणनीती आखते हे पाहणे निर्णायक ठरेल.