सातारा :एटीएमची आदलाबदल करून रोकड लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 15:25 IST2018-12-28T15:24:25+5:302018-12-28T15:25:28+5:30
सातारा : एटीएमची आदलाबदल करून १४ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात युवकावर ...

सातारा :एटीएमची आदलाबदल करून रोकड लांबविली
सातारा : एटीएमची आदलाबदल करून १४ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात युवकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
रवींद्र विनायक पवार (वय ५५,रा. सैदापूर, ता. सातारा) हे एका महाविद्यालयात लॅब अॅसिस्टंट आहेत. गुरुवारी दुपारी ते पैसे काढण्यासाठी भूविकास चौकातील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या एटीएममध्ये गेले होते.
यावेळी त्यांनी एक हजार रुपये काढले; परंतु एटीएममधून पावती बाहेर आली. त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या युवकाने मी पावती काढून देतो, असे त्यांना सांगितले. त्यांनी त्या युवकाला एटीएम दिले. मात्र, संबंधित युवकाने हातचलाखी करून एटीएमची अदलाबदल केली.
एटीएममधून पावती काढण्याच्या बहाण्याने त्याने पवार यांच्याकडून एटीएमचा पासवर्डही विचारला होता. त्यामुळे तेथून निघून गेल्यानंतर त्याने एका दुकानातून सोन्याचा कॉईन खरेदी केला. त्यानंतर त्याने त्याच एटीएममधून १४ हजारांची रोकड काढली.
रवींद्र पवार यांच्या मोबाईलवर एसएमएस आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. याबाबत अधिक तपास हवालदार हिम्मत दबडे-पाटील हे करत आहेत.
चोरटा सीसीटीव्हीत कैद
ज्या एटीएममधून चोरट्याने पैसे काढले. त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीत चोरटा कैद झाला आहे. त्यावरून पोलिसांना त्याचा शोध घेणे सोपे होणार आहे.