Satara: दारूच्या नशेत पतीने पत्नीला चाकूने भोसकले, रहिमतपूर येथे घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 15:47 IST2025-07-25T15:46:55+5:302025-07-25T15:47:09+5:30
पत्नीस जखमी अवस्थेत सोडून पळून गेला

Satara: दारूच्या नशेत पतीने पत्नीला चाकूने भोसकले, रहिमतपूर येथे घटना
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथील पतीने दारू पिऊन आपल्या पत्नीच्या पोटात चाकूने भोसकले. त्यानंतर पळून गेलेल्या संशयित पतीला रहिमतपूर पोलिसांनी शिताफीने पकडून अटक केली. जखमी झालेल्या महिलेचे नाव रुक्साना जमीर मुलाणी असून, पतीचे नाव जमीर नबीलाल मुलाणी (रा. राधाकृष्ण गल्ली, रहिमतपूर, ता. कोरेगाव, जि. सातारा) आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जमीर मुलाणी हा वारंवार दारू पिऊन पत्नी रुक्साना आणि त्यांच्या मुलांना मारहाण करीत होता. मंगळवारी (दि. २२) रात्री साडेनऊ वाजता जमीर मुलाणीने दारू पिऊन रुक्साना मुलाणीच्या पोटात चाकू खुपसून तिला गंभीर जखमी केले. त्यानंतर तो पत्नीस जखमी अवस्थेत सोडून घर सोडून पळून गेला.
ही घटना समजताच रहिमतपूर पोलिसांनी जखमी रुक्साना यांचा जबाब नोंदवून, जमीर मुलाणी विरोधात रहिमतपूर पोलिस ठाण्यात पत्नीला जिवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला. पसार झालेल्या जमीर मुलाणीला ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली.