सातारा जिल्हा तापू लागला; धरणे होऊ लागली रिकामी, सिंचन, पिण्याच्या पाण्यासाठी मागणी वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 19:42 IST2026-03-28T19:41:50+5:302026-03-28T19:42:03+5:30
सिंचनासाठी मागणी : कोयनेसह प्रमुख सहा प्रकल्पांत ८४ टीएमसी साठा

सातारा जिल्हा तापू लागला; धरणे होऊ लागली रिकामी, सिंचन, पिण्याच्या पाण्यासाठी मागणी वाढली
सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान चांगले झाल्याने सर्वच धरणे भरली होती. पण सध्या उन्हाळा सुरू असून, सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी मागणी वाढली आहे. यामुळे धरणांतून विसर्ग वाढत चालला आहे. धरणसाठा कमी होऊ लागला आहे. तरीही सध्या प्रमुख सहा प्रकल्पांत ८४ टीएमसीवर पाणीसाठा शिल्लक आहे. तर कोयनेत अजूनही ६१ टीएमसी पाणी उपलब्ध आहे.
सातारा जिल्ह्यात प्रामुख्याने खरीप आणि रब्बी असे दोन प्रमुख हंगाम घेतले जातात. येथील शेती पावसावर अवलंबून आहे. तसेच धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावरही हंगाम घेतला जातो. मान्सूनचा पाऊस चांगला झाला तरच शेतीसाठी पाणी पुरेसे होते. मागील दोन वर्षांत जिल्ह्यात चांगला पाऊस होत आला. त्यामुळे खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांनाही पाण्याची टंचाई जाणवली नाही. तसेच जिल्ह्यातील काही धरणांतील पाणी हे साताऱ्याबरोबरच सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील शेतीसाठी ही जाते.
जिल्ह्यात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी अशी प्रमुख सहा धरणे आहेत. या धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता सुमारे १४८ टीएमसी आहे. यामध्ये सर्वाधिक मोठे धरण हे कोयना असून, पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती होते. तसेच सिंचन आणि पिण्यासाठीही पाणी सोडले जाते. गेल्यावर्षीही कोयना धरण भरले होते. तसेच इतर सर्व प्रमुख धरणे ही भरून वाहिली. त्यामुळे यंदा सिंचन आणि पिण्यासाठी पाणी कमी पडणार नाही.
सध्या कोयना धरणात ६१.१६ टीएमसी पाणी आहे. तसेच इतर प्रमुख धरणांत ही चांगला पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या उन्हाळा वाढत चालला असून, सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे धरणांतून विसर्ग होत आहे. तरीही पुढील महिन्यापासून सिंचनासाठी आणखी मागणी वाढणार आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढणार आहे.
मागील वर्षीपेक्षा एक टीएमसी साठा कमी...
जिल्ह्यातील सर्व प्रमुख धरणे मागील वर्षी पूर्णपणे भरली होती. सध्या या सहा धरणांत एकूण ८४.६५ टीएमसी पाणीसाठा आहे. तर गेल्यावर्षी २६ मार्चला याच धरणांमध्ये ८५.३६ टीएमसी पाणीसाठा होता. यावरून यंदा धरणांत सुमारे एक टीएमसी पाणीसाठा कमी असल्याचे दिसून येत आहे.
कोयनेतून ३६०० क्युसेक विसर्ग...
जिल्ह्यातील काही प्रमुख धरणांतून विसर्ग सुरू आहे. यामध्ये कोयनेच्या पायथा वीजगृह धरून एकूण ३ हजार ६०० क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. त्याचबरोबर धोम धरणातून ५३९, कण्हेर २००, तारळी धरणातून १३४ क्युसेक पाणी सोडले जात आहे. उरमोडीतून ५५० क्युसेक विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील धोम ६.८५ प्रमुख धरणांमधील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
धरण - सध्या साठा - टक्केवारी - एकूण क्षमता
धोम- ६.८५ - ५०.७४ - १३.५०
कण्हेर- ६.३९ - ६२.४९ - १०.१०
कोयना- ६१.१६ - ५८.११ - १०५.२५
बलकवडी- २.०५ - ५०.२२ - ४.०८
तारळी- १.९४ - ३३.१७ - ५.८५
उरमोडी- ६.२६ - ६२.८५ - ९.९६