Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: अभिमानास्पद!, साताऱ्याने दिले १७ अध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 13:28 IST2025-06-09T13:28:17+5:302025-06-09T13:28:39+5:30

साताऱ्यात भरणार साहित्यिकांचा मेळा, ३२ वर्षांनंतर संमेलनाचा मान

Satara district gave 17 presidents of the Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan | Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: अभिमानास्पद!, साताऱ्याने दिले १७ अध्यक्ष

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: अभिमानास्पद!, साताऱ्याने दिले १७ अध्यक्ष

सातारा : मराठी साहित्य विश्वात प्रतिष्ठा प्राप्त केलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान यंदा राजधानी साताऱ्याला मिळाला आहे. पुणे येथे रविवारी पार पडलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बैठकीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी ही घोषणा केली. सातारा जिल्ह्याला १६ तर शहराला तब्बल ३२ वर्षांनंतर हा बहुमान मिळाल्याने साहित्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अभिमानाची बाब म्हणजे आजवर झालेल्या ९८ संमेलनांपैकी १७ अध्यक्ष सातारा जिल्ह्याने दिले आहेत.

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सदानंद साहित्य मंडळ (औदुंबर), महाराष्ट्र साहित्य परिषद (शाखा इचलकरंजी), दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा (कोल्हापूर) आणि महाराष्ट्र साहित्य परिषद (शाखा शाहूपुरी, सातारा) या संस्थांकडून निमंत्रणे आली होती. या स्थळांची पाहणी करण्यासाठी स्थळ निवड समिती गठीत करण्यात आली होती. या समितीकडून सर्व स्थळांची पाहणी केल्यानंतर रविवारी (दि. ८) सकाळी पुणे येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीत ९९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद यंदा साताऱ्याला देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

या निर्णयाचे साताऱ्यातील साहित्यप्रेमींकडून स्वागत करतानाच जल्लोषही करण्यात आला. या संमेलनाच्या माध्यमातून साताऱ्याच्या ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अस्मितेचा जागर होणार आहे. बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

‘मसाप’च्या कार्याची फलश्रृती

साताऱ्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेची स्थापना झाल्यापासून मराठी भाषा दिन, मराठी भाषा पंधरवडा, लेखक तुमच्या भेटीला, मराठी वाङ्मय मंडळ असे उपक्रम सुरू करण्यात आले. याशिवाय एक दिवसीय साहित्य संमेलन, दोन विभागीय साहित्य संमेलने, युवा नाट्य संमेलनही घेण्यात आले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी पंतप्रधानांना जिल्ह्यातून एक लाख पत्रे पाठविण्यात आली. दिल्लीत साहित्यिक आणि लोकप्रतिनिधींना घेऊन प्रार्थना आंदोलन करण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान साताऱ्याला मिळावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे देखील साहित्य परिषदेकडून पाठपुरावा करण्यात आला. या सर्वांची फलश्रृती व साहित्य संमेलनासाठी अनुकूल वातावरण, असा योग जुळून आल्याने साताऱ्याला मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळाले.

साताऱ्याने दिले १७ अध्यक्ष

आजवर झालेल्या ९८ संमेलनांपैकी १७ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सातारा जिल्ह्याने दिले आहेत. ही सातारा जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्रातील फार मोठी अभिमानाची बाब आहे. सातारा व सांगली जिल्ह्याचे विभाजन झाल्यावर आजवर एकूण सहा साहित्य संमेलने साताऱ्यात झाली आहेत.

साताऱ्यातील दुसरे संमेलन

सातारा शहरात १९९३ साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली मराठी साहित्य संमेलन पार पडले होते. आता ३२ वर्षांनंतर दुसऱ्यांदाच साताऱ्याला साहित्य संमेलनाचा मान मिळाला आहे. २००९ साली महाबळेश्वर येथे हे संमेलन पार पडले होते.

Web Title: Satara district gave 17 presidents of the Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan