थंड महाबळेश्वरपेक्षा सातारा ‘कूल’; हंगामातील निचांकी तापमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 19:45 IST2025-11-20T19:45:21+5:302025-11-20T19:45:41+5:30
गारठा कायम

थंड महाबळेश्वरपेक्षा सातारा ‘कूल’; हंगामातील निचांकी तापमान
सातारा : जिल्ह्यातील किमान तापमान चार दिवसांपाूसन घसरले असून बुधवारी सातारा शहरात ११ तर महाबळेश्वरचा पारा १२.५ अंश नोंद झाला आहे. यामुळे थंड हवेच्या महाबळेश्वरपेक्षा सातारा ‘कूल’ ठरले आहे. तसेच जिल्ह्याच्या इतर भागातीलही किमान तापमान १२ ते १३ अंशाच्या दरम्यान कायम असल्याने थंडीचा जोर दिसून येत आहे.
जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थंडीला सुरूवात झाली. सुरूवातीला पारा १५ अंशापर्यंत खाली आला होता. त्यानंतर किमान तापमानात मोठ्या प्रमाणात उतार आला. मागील चार-पाच दिवसांपासून तर पारा सतत खाली येत गेला. यामुळे गारठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. त्यातच हवेत शीत लहर असल्याने दुपारी ही थंडी जाणवत आहे. यामुळे शहरापेक्षा ग्रामीण भाग अधिक थंड झाला आहे. मंगळवारी महाबळेश्वरमध्ये १० अंशाची तर सातारा शहरात १०.६ अंश तापमानाची नोंद झालेली. हे या हंगामातील निचांकी तापमान ठरले. पण, बुधवारी किमान तापमानात वाढ झाली.
सातारा शहराचा पारा ११ अंशावर गेला. तर महाबळेश्वरचा पारा अडीच अंशाने वाढला. त्यामुळे बुधवारी महाबळेश्वरला १२.५ अंश किमान तापमान नोंद झाले. तरीही जागतिक पर्यटनस्थळ असणाऱ्या आणि थंड हवेच्या महाबळेश्वरपेक्षा सातारा शहर अधिक थंड असल्याचे दिसून आले. सातारा शहराबरोबरच परिसरातही गारठा कायम असल्याने माॅर्निंग वाॅकसाठी जाणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. सकाळी सात नंतरच अधिक करुन नागरिक घराबाहेर पडत आहेत. तर थंडीमुळे शहरात अनेक ठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. रात्री नऊ नंतर आणि पहाटेच्या सुमारास शेकोट्या पेटल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातच थंडीत वाढ झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. शेतकरीवर्ग दुपारच्या सुमारास शेतातील कामे उरकून घेत आहेत. तर विजेच्या वेळापत्रकाप्रमाणे शेतकरी रात्रीही पिकांना पाणी देण्याची मोटारी सुरू करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
सातारा शहरातील किमान तापमान..
दि. ५ नोव्हेंबर १८.५, ६ नोव्हेंबर १८.५, ७ नोव्हेंबर १८.७, ८ नोव्हेंबर १७.१, ९ नोव्हेंबर १४.५, १० नोव्हेंबर १३.६, ११ नोव्हेंबर १३.५, १२ नोव्हेंबर १५, १३ नोव्हेंबर १५, १४ नोव्हेंबर १४.४, १५ नोव्हेंबर १२, १६ नोव्हेंबर १२.१, १७ नोव्हेंबर ११.९, १८ नोव्हेंबर १०.६ आणि १९ नोव्हेंबर ११