Satara: घरातून चिमुकली गायब; शोधण्यासाठी ड्रोन, श्वान पथक, शंभर पोलिस रात्रभर झटले, सीसीटीव्हीत दिसली, पण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 16:22 IST2025-06-30T16:21:23+5:302025-06-30T16:22:57+5:30

सर्वांत मोठे सर्च ऑपरेशन

Satara city police conducted a major search operation at night using drones and dog squads to find a nine year old girl who had gone missing from her home | Satara: घरातून चिमुकली गायब; शोधण्यासाठी ड्रोन, श्वान पथक, शंभर पोलिस रात्रभर झटले, सीसीटीव्हीत दिसली, पण..

Satara: घरातून चिमुकली गायब; शोधण्यासाठी ड्रोन, श्वान पथक, शंभर पोलिस रात्रभर झटले, सीसीटीव्हीत दिसली, पण..

सातारा : घरातून गेलेल्या नऊ वर्षांच्या मुलीला शोधण्यासाठी सातारा शहर पोलिसांनी शनिवारी रात्री मोठे सर्च ऑपरेशन राबविले. ड्रोन, श्वान पथक, शंभर पोलिस तसेच स्थानिक नागरिकांनी यात सहभाग घेऊन बारा तासांत मुलीला शोधून काढले. जिल्हा पोलिस दलातील आतापर्यंतचे हे सर्वांत मोठे सर्च ऑपरेशन ठरले.

साताऱ्यातील सदर बझारमध्ये एक परप्रांतीय कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबातील नऊ वर्षांची मुलगी शनिवारी सायंकाळी पाच वाजता राहत्या घरातून अचानक गायब झाली. रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी न आल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. धावतच कुटुंबीय सातारा शहर पोलिस ठाण्यात आले. पोलिसांना मुलगी गायब झाल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर तातडीने सूत्रे हलली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलिस ठाण्यातील शंभर पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. रात्रीची वेळ असल्याने मुलीच्या बाबतीत बरेवाईट होऊ नये, यासाठी कुटुंबीयांसह पोलिसही चिंतेत होते. पोलिसांनी वेगवेगळ्या टीम तयार करून सर्च ऑपरेशन सुरू केले. पोलिसांच्या मदतीला स्थानिक नागरिकही धावून आले.

एमआयडीसीतील निर्जन ठिकाणे, बसस्टेशन, रेल्वे स्टेशन, झाडी, झुडपे, आजूबाजूची शेती, विहिरी तसेच सुमारे १५ सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. संपूर्ण परिसर रात्रभर पोलिसांनी पिंजून काढला. यामध्ये पोलिस दलाचे श्वान पथक, तीन ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे शोध घेतला जात होता, तर दुसरीकडे सोशल मीडियावरही मुलीचे फोटो पाठवून माहिती घेतली जात होती.

असे असतानाच रविवारी सकाळी पोलिसांच्या पथकाला आनंदाची बातमी येऊन थडकली. संबंधित मुलगी तिच्या शाळेतील मैत्रिणीच्या घरी सुखरूप असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन मुलीला पालकांच्या स्वाधीन केले. मुलीला पाहून पालकांना आपले अश्रू अनावर झाले. पोलिसांच्या या प्रयत्नाबद्दल स्थानिक नागरिक व मुलीच्या कुटुंबीयांनी सर्व पोलिसांचे आभार मानून सत्कार केला.

सीसीटीव्हीत ती दिसली, पण..

संबंधित मुलगी घरातून एकटी जाताना सीसीटीव्हीत दिसून आली. पण, पुढे कोठे गेली हे दिसले नाही. तिच्या घरापासून मैत्रिणीचे घर साधारण दीड किलोमीटर अंतरावर आहे. मैत्रिणीकडे गेल्यानंतर तिने आईला मी सांगून आले आहे. तुमच्याकडे राहणार आहे, असे सांगितल्यामुळे त्या कुटुंबालाही काही शंका आली नाही.

या पथकाने निर्जन ठिकाणे शोधून काढली..

पोलिस अधिकारी समाधान बिले, ए. एस. कांबळे, अशोक सावंजी, सुधीर मोरे, अनिल जायपत्रे, शामराव काळे, महिला उपनिरीक्षक अक्षदा इंगळे, हवालदार श्रीनिवास घाडगे, नीलेश यादव, सुजित भोसले, धनाजी यादव, राहुल घाडगे, अनिल सावंत, पंकज मोहिते, विक्रम माने, तुषार भोसले, नीलेश जाधव, अजिंक्य माने, दीपक गुरव, दीपक ताटे, महेंद्र पाटोळे, महेश देशमुख, दीपक इंगवले, इम्रान मेटकरी, समीर महांगडे, महिला सहायक फौजदार अनुभुले, पद्मीनी जायकर, सागर गायकवाड, सुहास कदम, राहुल फडतरे, सुशांत कदम, विशाल धुमाळ व अन्य कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक या कार्यवाहीत सहभागी होते.

Web Title: Satara city police conducted a major search operation at night using drones and dog squads to find a nine year old girl who had gone missing from her home