बनावट तणनाशक बनवणारी टोळी जेरबंद, साताऱ्यातील करंजेत टेम्पो पकडल्यानंतर रॅकेट उघडकीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 13:02 IST2025-07-12T13:01:54+5:302025-07-12T13:02:18+5:30

साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त

Satara city police arrest a gang of six people who were manufacturing fake herbicides for agriculture | बनावट तणनाशक बनवणारी टोळी जेरबंद, साताऱ्यातील करंजेत टेम्पो पकडल्यानंतर रॅकेट उघडकीस 

बनावट तणनाशक बनवणारी टोळी जेरबंद, साताऱ्यातील करंजेत टेम्पो पकडल्यानंतर रॅकेट उघडकीस 

सातारा : शेतीसाठी बनावट तणनाशके बनणाऱ्या सहा जणांच्या टोळीला सातारा शहर पोलिसांनी जेरबंद केले असून १२ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. करंजे नाक्यावर बनावट तणनाशके घेऊन जाणारा टेम्पो पकडल्यानंतर हे रॅकेट उघडकीस आले.

याप्रकरणी धैर्यशील अनिल घाडगे वय ३१ रा. शाहुपुरी सातारा, युवराज लक्ष्मण मोरे (वय २८ रेवडी, ता. कोरेगाव), गणेश मधुकर कोलवडकर (३०, रा. धालवडी, ता. फलटण), नीलेश भगवान खरात (३८ जाधववाडी, ता. फलटण), तेजस बाळासो ठोंबरे (३०, वडुज, ता. खटाव), संतोष जालिंदर माने (४५ नडवळ, ता. खटाव) यांच्यावर कॉपीराईट कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी, करंजे नाका, सातारा येथे शेतीसाठी लागणारी बनावट औषधे विक्री करण्यासाठी काही लोक चारचाकी गाडीतून येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली हाेती. त्यानुसार सातारा पोलिस व डीबी पथकाने बनावट औषधांची खात्री करण्यासाठी टू बडी कन्सल्टिंगचे सतीश तानाजी पिसाळ यांना सोबत घेऊन करंजे नाका येथे ८ रोजी दुपारी चार वाजता सापळा रचला. करंजे नाका येथे मोळाकडून आलेला टेम्पो थांबवून सतीश तानाजी पिसाळ यांच्या मदतीने औषधे तपासली. त्यांनी औषधे बायर कंपनीचे राउन्डअप असे नाव वापरून बनावट औषधे असल्याचे खात्रीशीर सांगितले.

त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक ढमाळ यांनी गाडीसह चालकास ताब्यात घेतले व जागीच पंचनामा केला. यावेळी २ लाख ६ हजार ७०० रुपयांच्या बनावट औषधाच्या एकूण २६० बॉटल व १ लाखाचा छोटा टेम्पो जप्त केला. यानंतर शाहुपुरी पोलिस ठाण्यात कॉपी राईट कायदा, ट्रेड मार्क कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर उर्वरित संशयितांना अटक केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजय ढमाळ करीत आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले, पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणचे पोलिस अधिकारी ढेरे, पोलिस उपनिरीक्षक ढमाळ व पोलिस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, नीलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे, रोहित बाजारे, जयवंत घोरपडे यांनी केली.

चालकाच्या चौकशीनंतर उर्वरित संशयित ताब्यात

चालकाकडे चौकशी केल्यानंतर ६ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रेवडी ता. कोरेगाव, फलटण व वडूज ता. खटाव येथील कारखान्यातून एकूण १२ लाख ५९ हजार ३७० रुपयांचे बायर कंपनीचे बनावट राउन्डअप औषधे व चारचाकी वाहन जप्त करण्यात आलेले आहे.

Web Title: Satara city police arrest a gang of six people who were manufacturing fake herbicides for agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.