सातारा: बेपत्ता माजी ग्रामपंचायत सदस्याचा विहिरीत आढळला मृतदेह, नेमके कारण अद्याप अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 14:03 IST2022-09-01T14:02:30+5:302022-09-01T14:03:07+5:30
हणमंत यादव चाफळ: पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील डेरवण येथील दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या माजी ग्रामपंचायत सदस्याचा मृतदेह एका विहिरीत ...

सातारा: बेपत्ता माजी ग्रामपंचायत सदस्याचा विहिरीत आढळला मृतदेह, नेमके कारण अद्याप अस्पष्ट
हणमंत यादव
चाफळ: पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील डेरवण येथील दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या माजी ग्रामपंचायत सदस्याचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला. अतुल कृष्णात सोनावले (वय-४०) असे या मृत माजी ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. ही घटना आज, गुरुवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद चाफळ पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अतुल सोनवले दोन दिवसापासून बेपत्ता होते. घरगुती कारणांमुळे तो घर सोडून निघून गेला होता. दरम्यान गावातील ग्रामस्थांनी सोशल मिडियावरुन अतुल बेपत्ता असुन सापडल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. नातेवाईकही त्याचा शोध घेत होते. यातच आज, गुरुवारी सकाळी गुऱ्हाळघर नावाच्या परिसरातील एका शेतकऱ्यास विहिरीत कोणीतरी पडल्याचे निदर्शनास आले.
संबंधित शेतकऱ्याने याबाबतची माहिती चाफळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने म्रुतदेह बाहेर काढला असता तो अतुलचा असल्याची ओळख पटली. या घटनेची माहिती सर्वत्र पसरताच घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजु शकले नाही. चाफळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.