Satara: सांगलीतील सिंचनासाठी कोयनेतून जादा पाण्याचा विसर्ग, विमोचक द्वार खुले
By नितीन काळेल | Updated: March 4, 2025 12:58 IST2025-03-04T12:54:21+5:302025-03-04T12:58:27+5:30
मागणीत वाढ

Satara: सांगलीतील सिंचनासाठी कोयनेतून जादा पाण्याचा विसर्ग, विमोचक द्वार खुले
सातारा : सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्याने कोयना धरणाचे नदी विमोचक द्वारही खुले करुन त्यातून १ हजार क्यूसेक पाणी विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे धरणातून एकूण ३ हजार १०० क्यूसेक पाणी कोयना नदी पात्रातून सांगलीसाठी सोडले जात आहे.
कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. मागीलवर्षी सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला हे धरण भरले होते. या धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती करण्यात येते. तसेच सिंचन आणि पिण्यासाठीही पाणी सोडले जाते. तर या धरणातील पाण्यावर महत्वाच्या तीन सिंचन योजना अवलंबून आहेत. यातील सर्वाधिक पाण्याची तरतूद सांगली जिल्ह्यासाठी आहे. त्यामुळे दरवर्षीच नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान धरणातील पाण्याची सांगली जिल्ह्याकडून मागणी होते. सांगली पाटबंधारे विभागाकडून काही दिवसांपूर्वीच पाण्याची मागणी वाढली होती. त्यामुळे कोयना धरण व्यवस्थापनाने मंगळवारी धरणातून अधिक पाणी सोडण्यास सुरूवात केली आहे.
सांगलीसाठी मागील दोन महिन्यापासून कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून २ हजार १०० क्यूसेक पाणी विसर्ग करण्यात येत होता. त्यानंतर मंगळवारी दुपारी १२ वाजता कोयना धरण नदी विमोचक द्वार उघडून १ हजार क्यूसेक पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे सध्या सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी ३ हजार १०० क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी कोयना नदीपात्राद्वारे जात आहे.