हेळगाव ते खराडे फाटा रस्ता होतोय चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:35 IST2021-03-22T04:35:07+5:302021-03-22T04:35:07+5:30

खराडे फाटा ते हेळगाव रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू झाले होते; मात्र कामाचा दर्जा व्यवस्थित नसल्याने पाडळीच्या ग्रामस्थांनी दोनवेळा ...

The road from Helgaon to Kharade fork is shiny | हेळगाव ते खराडे फाटा रस्ता होतोय चकाचक

हेळगाव ते खराडे फाटा रस्ता होतोय चकाचक

खराडे फाटा ते हेळगाव रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू झाले होते; मात्र कामाचा दर्जा व्यवस्थित नसल्याने पाडळीच्या ग्रामस्थांनी दोनवेळा काम बंद पाडले. त्यानंतर कोरोनाचा काळ चालू झाला. त्यामुळे काम बंद करावे लागले; मात्र काही दिवसांपूर्वी रस्त्यानजीक खडी टाकायला सुरुवात झाली आणि पुन्हा कामास सुरुवात झाली. हा रस्ता कऱ्हाड आणि कोरेगाव या दोन तालुक्यांना जोडतो. तसेच अनेक मोठ्या बाजारपेठा असलेल्या गावांनाही या रस्त्याने जोडले आहे. त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने या रस्त्याला महत्त्व आहे. या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली होती. दरवर्षी प्रशासन खड्डे बुजविण्याचे काम हाती घेत होते; पण काही दिवसानंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती निर्माण होत होती. या मार्गावरून ऊस वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे हा रस्ता मजबूत होणे गरजेचे आहे. रस्ता खराब झाल्याने अपघातही घडत होते. तसेच जागोजागी पडलेले खड्डे अपघाताला निमंत्रण देत होते. सध्या रस्त्याचे काम सुरू झाल्याने ग्रामस्थांसह प्रवाशांतून समाधान व्यक्त केले जात आहे. रस्त्याचे काम दर्जेदार करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.

फोटो : २१केआरडी०३

कॅप्शन : कऱ्हाड तालुक्यातील खराडेफाटा ते हेळगाव रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. (छाया : जगन्नाथ कुंभार)

Web Title: The road from Helgaon to Kharade fork is shiny