Satara: जादा परताव्याचे आमिष, हवाई दलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याला कोटींचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:20 IST2025-06-05T12:19:48+5:302025-06-05T12:20:40+5:30
कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Satara: जादा परताव्याचे आमिष, हवाई दलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याला कोटींचा गंडा
कऱ्हाड (जि. सातारा) : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत हवाई दलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याला तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी अन्य काही जणांची फसवणूक केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
माधव मनोहर काळे (६१, रा. शुक्रवार पेठ, कऱ्हाड) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. किशोर अधिकराव पिसाळ (रा. करवडी, ता. कऱ्हाड) व दीपक बाळकृष्ण यादव (रा. सोळशी, ता. कोरेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. जानेवारी २०२३ मध्ये माधव काळे यांची किशोर पिसाळ याच्याशी ओळख झाली. त्याने स्वत:ला सैन्यदलातून निवृत्त झाल्याचे सांगून विश्वास संपादन केला. तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची संधी असल्याचे सांगून दीपक यादव याच्याशी माधव काळे यांची ओळख करून दिली.
दीपक यादव यानेही मी सैन्य दलातील सेवानिवृत्त अधिकारी आहे, असे माधव काळे यांना सांगितले. तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मी महिन्याला ४ टक्क्यांप्रमाणे वर्षाला ४८ टक्के परतावा देईन, असे आमिष दाखवले. संशयितांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून माधव काळे यांनी वेळोवेळी एकूण एक कोटी दहा लाख रुपये दीपक यादव याच्या बँक खात्यात वर्ग केले. सुरुवातीला माधव काळे यांना संशयितांनी काही रक्कम दिली. संशय आल्यामुळे काळे यांनी सर्व पैसे परत मागितले; मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.