फुटक्या कालव्याची आजपासून दुरुस्ती

By Admin | Updated: August 18, 2015 00:42 IST2015-08-18T00:42:57+5:302015-08-18T00:42:57+5:30

अभियंत्यांकडून पाहणी : शेतकऱ्यांचे दहा लाखांचे नुकसान

Repairing the defenseless canal from today | फुटक्या कालव्याची आजपासून दुरुस्ती

फुटक्या कालव्याची आजपासून दुरुस्ती

कोरेगाव : अंबवडे संमत कोरेगाव येथे शनिवारी दुपारी फुटलेला धोम डावा कालवा आजही (सोमवार) फुटलेल्या अवस्थेत कायम आहे. पाण्याचा विसर्ग कमी केला असला तरी पाण्याचा पाझर कायम असल्याने फुटलेल्या ठिकाणाहून पाणी वाहत होते. कार्यकारी अभियंता व उपअभियंत्यांनी सोमवारी दुपारी या कालव्याची पाहणी केली. मंगळवारपासून दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्याचे विभागातर्फे सांगण्यात आले.
दरम्यान, महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले असून, त्यामध्ये सात लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यकत केला आहे, प्रत्यक्षात दहा लाखांहून अधिक नुकसान झाले आहे.
फुटलेल्या कालव्याची परिस्थिती सोमवारी बिकट झाली. पाण्याच्या प्रवाहामुळे फुटलेल्या ठिकाणाला विहिरीचे स्वरूप आले आहे. पाणी इतरत्र पोट कालव्यांमध्ये वळविले असले तरी पाझरामुळे पाणी वाहत असून, ते ओढ्याला जाऊन मिळत आहे. धोमचे कार्यकारी अभियंता टी. डी. जाधव यांनी उपअभियंता एस. एम. गोडसे व शाखा अभियंता एस. एन. बगाडे यांच्यासमवेत फुटलेल्या ठिकाणाची पाहणी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी सकाळपासून दुरुस्तीचे काम सुरू करणार असल्याचे बगाडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
तहसीलदारांची नोटीस
तहसीलदार रवींद्र रांजणे यांनी धोम पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना सोमवारी सकाळीच नोटीस बजावली असून, घटनेची माहिती का दिली नाही, याबाबत स्पष्ट शब्दात विचारणा केली. रांजणे यांनी किन्हईचे मंडलाधिकारी एस. के. घनवट व तलाठी आर. एम. पवार यांना कालवा फुटून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार घनवट व पवार यांनी पंचनामा केला असून, त्यामध्ये आले पिकांचे झालेले नुकसान, वाहून गेलेली जमीन, ठिबक सिंचन योजनेची झालेली दुरवस्था, गाळाने भरलेली विहीर व त्यातील मोटारींची नोंद केली असून, प्राथमिक ६ लाख ७० हजारांचे नुकसान झाले असल्याचे नमूद केले आहे.

Web Title: Repairing the defenseless canal from today