Satara-ZP Election: 'मिनि'मंत्रालयाच्या निवडणुकीत विधानसभा मतदारसंघाची पुनर्बांधणी; जागा-वाटपाची रस्सीखेच सुरू
By दीपक देशमुख | Updated: January 14, 2026 18:31 IST2026-01-14T18:29:59+5:302026-01-14T18:31:37+5:30
जिल्ह्यावर वर्चस्व राखण्यासाठी पक्ष सरसावले

Satara-ZP Election: 'मिनि'मंत्रालयाच्या निवडणुकीत विधानसभा मतदारसंघाची पुनर्बांधणी; जागा-वाटपाची रस्सीखेच सुरू
दीपक देशमुख
सातारा : विधानसभा निवडणूक एकजुटीने लढवणाऱ्या महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये नगरपालिका निवडणुकीवेळी खटका उडाला होता. त्यानंतर आता जिल्हा परिषदेवर वर्चस्व राखण्यासाठी भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात पुन्हा रस्सीखेच दिसणार आहे. या निवडणुकांमध्ये ग्राउंड लेव्हलवर ताकद आमजावल्यानंतर आगामी विधानसभेची समीकरणे ठरणार आहेत.
गेल्या नऊ वर्षांपासून जिल्हा परिषदेवर प्रशासकराज असले तरी वर्षभरापासून इच्छुकांकडून छुपी तयारी सुरूच होतीच. आता निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक चार आमदार असणाऱ्या भाजपचा जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवण्याचा अजेंडा लपून राहिलेला नाही. नगरपालिका निवडणुकीतही भाजपाने याची चुणूक दाखवली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खेचून आणण्यासाठी जागावाटपात जास्त जागा मिळवणे आणि सर्वाधिक जागा जिंकणे, यावर भाजपचा भर राहणार आहे.
आजअखेर झेडपीवर वर्चस्व ठेवणाऱ्या राष्ट्रवादीला बदललेल्या परिस्थितीचा अंदाज असला आहे. तरीही जेथे पक्षाची ताकद आहे, त्या जागांवर मजबूत दावा मांडण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदेसेनाही आपले गडावर वर्चस्व राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
वाचा : सातारा ‘झेडपी’च्या ६५ गट अन् पंचायत समितींच्या १३० गणांसाठी रणसंग्राम
दुसरीकडे महाविकास आघाडीच्या पक्षांची अस्तित्त्वाची लढाई आहे. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाची बोलणी फिस्कटतील, त्याठिकाणी महाविकास आघाडीच्या समविचारी पक्षाशी सोयरीक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा परिषदेच्या निकालानंतर पक्षांच्या ताकदीबरोबरच कार्यकर्त्यांचीही ताकद समजणार आहे. त्यानुसार पुढील विधानसभेची रणनीती ठरवली जाऊ शकते.
विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच रणनीती
मतदारसंघ सुरक्षित राखण्यासाठी सर्वच आमदारांनी निवडणूक हातात घेतली असून, मेळावे, बैठका, इच्छुकांच्या मुलाखती या माध्यमातून तयारी सुरू आहे. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीला विरोधात काम करणारे तसेच मदत करणाऱ्यांचा लेखा-जोखा आमदारांनी जवळ ठेवला आहे. आगामी विधानसभेला कोण सोबत येईल, याचाही विचार जिल्हा परिषदेचे उमेदवार ठरवताना घेतला जात आहे. एकूणच पुढील विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच रणनीती आखली जात आहे.
जागा-वाटपाची रस्सीखेच सुरू
जिल्ह्यात कराड उत्तर, कराड दक्षिण, माण-खटाव आणि सातारा याठिकाणी चार आमदार आहेत. भाजपचे वर्चस्व असलेल्या या मतदार संघांतच ३२ जिल्हा परिषद गट आहेत. याशिवाय फलटणचे आमदार राष्ट्रवादीचे असले तरी ते मुळचे भाजपतून तांत्रिक अडचणीमुळे राष्ट्रवादीत गेले आहेत. त्याठिकाणी शिंदेसेना आणि आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीही ताकद असली तरी जागा-वाटपावेळी मोठ्या राजकीय उलथापालथी होण्याची शक्यता आहे.