Republic Day: वय अवघे सतरा वर्षे, यशवंतराव चव्हाणांवर प्रतिज्ञापत्रक तयार करण्याची जबाबदारी; २६ जानेवारी १९३०ला कृष्णाकाठी फडकवला होता तिरंगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 12:53 IST2026-01-27T12:51:22+5:302026-01-27T12:53:12+5:30
भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले असले, तरी तब्बल १७ वर्षे आधीच लाहोरच्या अधिवेशनात पंडित नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली २६ जानेवारी १९३० हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला

Republic Day: वय अवघे सतरा वर्षे, यशवंतराव चव्हाणांवर प्रतिज्ञापत्रक तयार करण्याची जबाबदारी; २६ जानेवारी १९३०ला कृष्णाकाठी फडकवला होता तिरंगा
दीपक देशमुख
सातारा : भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले असले, तरी तब्बल १७ वर्षे आधीच लाहोरच्या अधिवेशनात पंडित नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली २६ जानेवारी १९३० हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला. त्यानुसार संपूर्ण देशासह सातारा जिल्ह्यातही तिरंगी ध्वज फडकवून झेंडावंदन करण्यात आले.
महात्मा गांधी यांनी ‘यंग इंडिया’ या आपल्या नियतकालिकात हा दिन साजरा करण्याचा आराखडा जाहीर केला होता. त्यानुसार देशभर शांततामय, शिस्तबद्ध पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा निर्धार झाला. झेंडावंदन, स्वातंत्र्याची शपथ, विधायक कार्य असा कार्यक्रम ठरविण्यात आला. याच धर्तीवर कराडमध्येयशवंतराव चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही नियोजन केले होते. २५ जानेवारी १९३० रोजी रात्री व्यापारी हरिभाऊ लाड यांच्या छापखान्यात स्वातंत्र्याची प्रतिज्ञा पत्रिका छापण्याचे काम पहाटेपर्यंत सुरू होते.
देशभरही याच दिवशी खेडोपाडी, शहराशहरांत अशाच पद्धतीने स्वातंत्र्याची घोषणा झाली. साताऱ्यातील कृष्णाकाठचा हा प्रतीकात्मक स्वातंत्र्य दिन यशवंतराव चव्हाण यांच्यासह अनेक स्वातंत्र्यवीरांच्या पुढील स्वातंत्र्य संग्रामाची सुरुवात ठरली. पुढे दरवर्षी २६ जानेवारी स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा होत राहिला. अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला.
ती २६ जानेवारीची पहाट...
यशवंतराव चव्हाण यांनी तयार केलेली प्रतिज्ञा २६ जानेवारीच्या सकाळी कृष्णा घाटावर वाचली जाणार होती. पहाटे चार वाजेपर्यंत छपाई पूर्ण करून सकाळी सर्वजण एकत्र जमले. २६ जानेवारी १९३० च्या सकाळी कृष्णाकाठी तिरंगी ध्वज फडकवून झेंडावंदन करण्यात आले. सर्वांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची शपथ घेतली.
अन् यशवंतराव चव्हाण यांच्यावर जबाबदारी..
कराडचे भाऊसाहेब बटाणे, हरिभाऊ लाड आदी मंडळींना यशवंतराव चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते जाऊन भेटले. त्यावेळी महाराष्ट्र प्रांतिकचे पदाधिकारी असलेले कराडचे सदाशिवराव आळतेकर यांची भेट घेण्यात आली. यावेळी उहापोह होऊन प्रतिज्ञापत्रक तयार करून वाचावे, असे ठरले. हे प्रतिज्ञापत्रक तयार करण्याचे काम यशवंतराव चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आले. यावेळी यशवंतराव चव्हाण यांचे वय अवघे सतरा वर्षे होते.