Satara: कास पठारावरील रेव्ह पार्टीत धिंगाणा, दारुची बाटली डोक्यात घालून मारहाण; पाचजणांवर गुन्हा
By नितीन काळेल | Updated: December 12, 2024 19:40 IST2024-12-12T19:33:36+5:302024-12-12T19:40:55+5:30
सातारा : जागतिक पर्यटनस्थळ असणाऱ्या कास पठावरावरील एका हाॅटेलातील रेव्ह पार्टीत धिंगाणा झाला. संगीताच्या तालावर नृत्य सुरू असतानाच मद्याच्या ...

संग्रहित छाया
सातारा : जागतिक पर्यटनस्थळ असणाऱ्या कास पठावरावरील एका हाॅटेलातील रेव्ह पार्टीत धिंगाणा झाला. संगीताच्या तालावर नृत्य सुरू असतानाच मद्याच्या नशेत मारहाणीचा प्रकार घडला. तसेच डोक्यात दारुची बाटलीही मारण्यात आली. याप्रकरणी मेढा पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, याप्रकरणी प्रतीक बापूराव दळवी (रा. जकातवाडी, ता. सातारा) याने तक्रार दिलेली आहे. त्यानुसार श्रेयस श्रीधर भोसले (पूर्ण पत्ता नाही रा. सातारा), सोन्या जाधव, रोहन जाधव, अमर पवार (तिघांचेही पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) आणि समीर सलीम कच्छी (रा. सैदापूर, सातारा) आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी सांगितले की, कास पठारावरील एेकीव, ता. जावळी गावच्या हद्दीतील एका हाॅटलेमध्ये शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास मारहाणीचा प्रकार घडला. फिर्यादी प्रतीक दळवी आणि त्याचे मित्र हे एेकीव येथील एका हाॅटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे संगीताच्या तालावर तीन ते चार नृत्यांगना डान्स करत होत्या.
यावेळी फिर्यादीचा मित्र धीरज शेळके याच्या डोक्यात एका दारुच्या नशेतील संशयिताने काही कारण नसताना मद्याची बाटली मारली. त्यामुळे फिर्यादीने त्यास का मारले असा जाब विचारला. यावरुन बाचाबाची होऊन चिडून संशयिताने हातातील दारुच्या बाटलीने फिर्यादीच्या डोकीत आणि पाठीतही मारहाण केली. त्याचबरोबर संशयितांच्या साथीदारांनीही फिर्यादी प्रतीक दळवीला शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी आणि दारुच्या बाटल्यानी मारहाण करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला आहे. सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.